

ग्रंथालयाच्या तयार इमारतीला कुलूप कायम
स्थानिक नागरिकांमधून नाराजी
नेरूळ, ता. २५ (बातमीदार) : सानपाडा सेक्टर ११ येथे नवी मुंबई महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या मध्यवर्ती ग्रंथालयाची इमारत पूर्ण होऊनही ती अद्याप नागरिकांसाठी खुली झालेली नाही. देखणी वास्तू तयार असताना ग्रंथालयाला कुलूप असल्याने विद्यार्थी, वाचक आणि स्थानिक नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
सार्वजनिक निधीतून उभारलेली ही इमारत वापराविना पडून राहिल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई सरचिटणीस किशोर दांगट यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन ग्रंथालय तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे.
जनतेच्या करातून उभारलेली सार्वजनिक मालमत्ता वापराविना पडून राहणे ही चिंतेची बाब असल्याचे दांगट यांनी निवेदनात नमूद केले आहे. इमारतीचा वापर सुरू न झाल्यास तिची देखभाल आणि दुरुस्ती यांवर भविष्यात अतिरिक्त खर्च करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही ग्रंथालय सुरू करण्यास विलंब का होत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
ग्रंथालय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली पुस्तकांची खरेदी, फर्निचर, संगणक प्रणाली, इंटरनेट सेवा आणि मनुष्यबळाची व्यवस्था पूर्ण झाली आहे का, याबाबत दांगट यांनी प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागितले आहे. पुस्तक खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्यास पुस्तकांचा पुरवठा कधी होणार, तसेच ग्रंथालय सुरू करण्यातील प्रशासकीय किंवा तांत्रिक अडचणी कोणत्या आहेत, याची माहितीही त्यांनी मागितली आहे.
इमारतीचे बांधकाम नेमके कधी पूर्ण झाले, ग्रंथालय सुरू करण्यासाठी आणखी किती कालावधी लागणार आणि वापराविना पडून असलेल्या वास्तूमुळे संभाव्य आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असे प्रश्नही दांगट यांनी उपस्थित केले आहेत.
सार्वजनिक निधीतून उभारलेली वास्तू केवळ शोभेची इमारत बनून राहू नये. तिचा प्रत्यक्ष लाभ विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार आणि वाचनप्रेमींना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रंथालय नागरिकांसाठी सुरू करण्याची निश्चित तारीख महापालिकेने जाहीर करावी आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून कामकाज तातडीने सुरू करावे, अशी आग्रही मागणी किशोर दांगट यांनी केली आहे. आता महापालिका प्रशासन या निवेदनाची दखल घेऊन ग्रंथालय सुरू करण्याबाबत कोणती कार्यवाही करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.