भिवंडीत दोन मुलींसह चौघे बेपत्ता

भिवंडीत दोन मुलींसह चौघे बेपत्ता
Published on: 

भिवंडी, ता. २५ (वार्ताहर) : भिवंडी शहर आणि परिसरातून दोन अल्पवयीन मुलींसह चार जण बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कशेळी, नालापार, गायत्रीनगर आणि नारपोली परिसरातील या घटनांप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांत तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, पोलिसांकडून बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कशेळी येथील स्वराज्य रेसिडेन्सीमध्ये राहणारे हेमंत मौर्य (वय ३८) हे १९ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडले. मात्र, ते परत न आल्याने त्यांचे भाऊ वीरेंद्र मौर्य यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार नारपोली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. नालापार येथील नेहल आलम अन्सार अहमद खान (वय २६) हेही १९ ऑक्टोबरला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एका हॉटेलजवळून निघाल्यानंतर बेपत्ता झाले. शोध घेऊनही ते न सापडल्याने २१ ऑक्टोबरला भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. गायत्रीनगर परिसरातील रामनगर येथील १७ वर्षीय मुलगी २२ ऑक्टोबरला सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडली. मात्र, ती परत न आल्याने तिच्या वडिलांनी शांतीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, नारपोलीतील मोतीबाई म्हात्रे नगर येथील १६ वर्षीय मुलगीही २२ ऑक्टोबरला बेपत्ता झाली. ती सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान घरातून बाहेर पडली होती. कुटुंबीयांनी शोध घेऊनही ती न सापडल्याने नारपोली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणीही अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या चारही प्रकरणांचा तपास संबंधित पोलिस ठाण्यांकडून सुरू असून, बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com