काळू, डोईफोडी नदीपात्रात अवैध रेती उपसा सुरूच

काळू, डोईफोडी नदीपात्रात अवैध रेती उपसा सुरूच
Published on: 

मुरबाड, ता. २५ (वार्ताहर) : तालुक्यातील काळू आणि डोईफोडी नदीपात्रांत जेसीबीसह अन्य यांत्रिक साधनांच्या मदतीने खुलेआम अवैध रेती उपसा सुरू असल्याचे समोर आले आहे. दररोज डम्परमधून रेतीची वाहतूक होत असतानाही महसूल प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते दिनेश जाधव यांनी केला आहे. या प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करावा, सरकारच्या महसुलाचे झालेले नुकसान निश्चित करावे आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी मुरबाड तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
उमरोली खुर्द येथील डोईफोडी नदीपात्रात कथित अवैध रेती उपसा झाल्याची चौकशी करण्याची मागणी जाधव यांनी केली आहे. या प्रकारामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून, रस्त्यांचे नुकसान आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. अवैध रेती उपशामुळे सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचा आरोप करत जाधव यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणात आर्थिक साटेलोटे असल्याचाही आरोप त्यांनी केला असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com