

भातशेती करपल्याने शेतकरी संकटात
रोहा तालुक्यात पाच हजार हेक्टर क्षेत्राला फटका; १९१ गावांतील पंचनाम्यांची प्रतीक्षा
रोहा, ता. २५ (बातमीदार) : रोहा तालुक्यात यंदा भातपिकाला मोठा फटका बसला असून, उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यातील प्रतिकूल परिस्थिती आणि पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तालुक्यात सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्रावर भातशेती केली जाते, मात्र नुकसानग्रस्त १९१ गावांतील पंचनाम्यांची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नसल्याने शेतकऱ्यांना शासकीय मदतीची प्रतीक्षा आहे. दिवाळी तोंडावर आली असतानाही मदतीबाबत निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
रोहा तालुक्यातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह भातशेतीवर अवलंबून आहे. बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी आणि मशागतीसाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे, मात्र पिकांचे नुकसान झाल्यास वर्षभराचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची भीती आहे. शेतीसाठी घेतलेली कर्जे, घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि पुढील हंगामाची तयारी यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण वाढला आहे.
कृषी विभागाच्या प्राथमिक निरीक्षणानुसार, मागील वर्षांच्या तुलनेत यंदा भात उत्पादनात २५ ते ३० टक्के घट दिसून येत आहे. सध्या शासनाचे पीक कापणी प्रयोग सुरू असून, त्यांचे निष्कर्ष आल्यानंतर उत्पादनाचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे, मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी आवश्यक असलेले पंचनामे अद्याप रखडले आहेत.
चौकट :
पंचनाम्यांसाठी शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा
तालुक्यातील १९१ गावांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी पंचनामे होणे आवश्यक आहे, मात्र त्याबाबतचे आदेश शासनाकडून अद्याप प्राप्त झालेले नाहीत. आदेश मिळाल्यानंतर पंचनामे करण्यात येतील, अशी माहिती रोहा तालुका कृषी अधिकारी महादेव करे यांनी दिली. शासनाने तातडीने आदेश देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
मुनवलीत पीक वाचविण्याची धडपड
अलिबाग : पावसाने दडी मारल्याने अलिबाग तालुक्यातील मुनवली, सोगांव, चोरोंडे, मापगांव आणि बहिरोळे परिसरातील भातशेती संकटात आली आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकरी विहिरी आणि कूपनलिकांमधील पाणी मोटारीच्या साहाय्याने शेतात सोडत आहेत, मात्र सतत पाणी उपसल्याने वीजबिलाचा खर्च वाढत असून, जलसाठ्यावरही ताण येत आहे. पाऊस न झाल्यास उपलब्ध पाण्यावर पीक किती दिवस टिकवायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. पीक हातातून जाऊ नये म्हणून मोटारीने पाणी देण्याची धडपड सुरू आहे. आता पाऊस झाला नाही, तर विहीर आणि कूपनलिकेच्या पाण्यावर पीक किती दिवस टिकवणार, हा प्रश्न आहे, असे मुनवली येथील शेतकरी सचिन घाडी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.