पनवेलमध्ये फुलपाखरू उद्यानाचे लोकार्पण

पनवेलमध्ये फुलपाखरू उद्यानाचे लोकार्पण
Published on: 

पनवेलमध्ये फुलपाखरू उद्यानाचे लोकार्पण
जैवविविधतेचा आविष्कार; निसर्गप्रेमींसाठी नवी पर्वणी
पनवेल, ता. २५ (बातमीदार) : पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेच्या जतनाला चालना देणारे फुलपाखरू उद्यान पनवेलमधील साईनगर येथे नागरिकांसाठी खुले झाले आहे. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चॅरिटेबल ट्रस्ट आणि पनवेल महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या या उद्यानाचे लोकार्पण लोकनेते तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्यानामुळे पनवेलच्या सौंदर्यात भर पडली असून, निसर्गप्रेमी आणि पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी नवे ठिकाण उपलब्ध झाले आहे.

रोटरी प्रांत ३१३१ चे माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रकल्पासाठी गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. विविध सामाजिक संस्था, पनवेल महानगरपालिका आणि विस्टा फूड्स प्रा. लि. यांच्या सहकार्याने हा प्रकल्प पूर्णत्वास आला. महाराष्ट्रातील फुलपाखरू उद्यानाचे जनक म्हणून ओळखले जाणारे रोटरीचे दिवाकर ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानाची उभारणी करण्यात आली. विस्टा फूड्सच्या सीएसआर निधीतून येथे रोपांची लागवड करण्यात आली असून, विविध प्रकारच्या फुलपाखरांना पोषक वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे.

फुलपाखरे ही पर्यावरणातील जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यांच्या अधिवासासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे, स्थानिक वनस्पतींचे महत्त्व अधोरेखित करणे आणि नागरिकांमध्ये निसर्गसंवर्धनाबाबत जागरूकता वाढवणे, या दृष्टीने हे उद्यान महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः मुलांना आणि विद्यार्थ्यांना फुलपाखरांचे जग जवळून अनुभवण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे हे उद्यान केवळ विरंगुळ्याचे ठिकाण न राहता पर्यावरण शिक्षणाचे केंद्र म्हणूनही विकसित होण्याची अपेक्षा आहे.

लोकार्पण सोहळ्यास आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार बाळाराम पाटील, महापौर नितीन पाटील, महापालिका आयुक्त मंगेश चितळे, कामगार नेते महेंद्र घरत, नगरसेवक परेश ठाकूर, अजय बहिरा, गणेश कडू, सुमीत झुंजारराव, नगरसेविका डॉ. अस्मिता घरत यांच्यासह रोटरीचे पदाधिकारी, प्रकल्पाचे चेअरमन सुदीप गायकवाड, सहचेअरमन योगेश महाजन आणि नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com