

भिवंडी, ता. २५ (वार्ताहर) : महापालिका क्षेत्रात आरोग्य व्यवस्थेबाबत नेहमीच ओरड आहे. भिवंडी पालिकेत विविध आरोग्यसेवा अंतर्गत सेवा बजावणाऱ्या तिघा डॉक्टरांनी दुसऱ्या शासकीय रुग्णालय, आस्थापनांवर मानधनावर काम करीत मानधन लाटल्याचा प्रकार समोर आला आहे.
स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत नगरसेवक फराज बहाउद्दीन यांनी आरोग्यवर्धिनी केंद्र कॅबिनबाबत माहिती मागवली होती. त्या वेळी काही डॉक्टर काम दुसरीकडे करून मानधन मात्र पालिकेकडून घेत असल्याचा दावा पुराव्यानिशी केला होता. त्यानंतर पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप गाडेकर यांना सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती ईशा इम्रान खान यांनी दिले होते. या तपासणीमध्ये डॉ. अब्दुल रेहमान रईस अन्सारी, डॉ. मौझम हुसेन खान आणि डॉ. सोहन देवराज नाईक यांनी दोन आस्थापनांमधून मानधन घेतल्याचे समोर आले.
डॉ. अन्सारी यांची नेमणूक बंदर मोहल्ला येथे सुरू केलेल्या नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर येथे केली होती. डॉ. खान यांची नुरीनगर येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, तर डॉ. नाईक यांची नेमणूक कारवली रोड येथील नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. याच कालावधीत तिन्ही डॉक्टर इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय येथे कंत्राटी पद्धतीने काम करीत असल्याची माहिती रुग्णालयाच्या अधीक्षका डॉ. माधवी पंदारे यांनी वैद्यकीय विभागाला कळवले आहे. यामुळे पालिका वैद्यकीय विभागात खळबळ उडाली असून, दोन दिवसांत खुलासा करावा अन्यथा कामावरून कमी का करण्यात येऊ नये, अशा नोटिशी गाडेकर यांनी बजावल्या आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालयाकडून त्यांचे मस्टर, कामाचे नियोजन मागविले आहे.
डॉक्टरांकडून मानधनाची रक्कम वसूल करावी
तिन्ही डॉक्टरांनी नागरिकांची फसवणूक करून मानधन लाटले आहे. त्यामुळे गुन्हा दाखल करून त्यांना आजतागायत दिलेले सर्व मानधन रक्कम वसूल करावी, अशी मागणी बहाउद्दीन यांनी केली आहे, तर कंत्राटी भरतीसंदर्भातील मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती डॉ. गाडेकर यांनी दिली.