

कळव्यात दोघांवर प्राणघातक हल्ला
वृद्धाला त्रास देणाऱ्यांना हटकल्याचा राग; पाच जणांना अटक
कळवा, ता. २५ (बातमीदार) : कळवा बाजारपेठेत रस्त्यावर झोपलेल्या वृद्धाला त्रास देणाऱ्या तरुणांना हटकल्याचा राग मनात धरून टोळक्याने दोन तरुणांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची घटना शनिवारी (ता. २४) मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास घडली. या हल्ल्यात प्रशांत आर्यमाने (वय ५३) आणि दिवेश मोरे (वय २५) हे दोघे जखमी झाले असून, याप्रकरणी कळवा पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
कळवा बाजारपेठेतील आर्यमाने चौकात प्रिन्स इलेक्ट्रॉनिक्स दुकानाजवळील कठड्यावर एक वृद्ध झोपले होते. त्या वेळी ईश्वरनगर-दिघा परिसरातील काही तरुण त्यांची टिंगलटवाळी करून त्यांना त्रास देत असल्याचे प्रशांत आर्यमाने आणि दिवेश मोरे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तरुणांना हटकून वृद्धाला त्रास देऊ नका, असे सांगितले. त्यावरून प्रशांत आणि तरुणांमध्ये बाचाबाची झाली.
या वादाचा राग मनात धरून तरुणांनी प्रशांत आणि दिवेश यांच्यावर चॉपरसारख्या धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात प्रशांत यांच्या हात आणि उजव्या खांद्यावर, तर दिवेश यांच्या कपाळावर वार करण्यात आले. जखमी दोघांना उपचारांसाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हल्लेखोर तरुण मद्यधुंद अवस्थेत होते. ते पार्टी करून आले होते. त्यांच्या हातात चॉपर, तलवार आणि कुऱ्हाड यांसारखी धारदार शस्त्रे होती. हा हल्ला कोणाच्या सांगण्यावरून पूर्वनियोजित पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप प्रशांत यांच्या नातेवाइकांनी केला आहे. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करून ईश्वरनगर-दिघा परिसरातून पाच जणांना अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.