भिवंडीत चोरी, फसवणुकीच्या घटना

भिवंडीत चोरी, फसवणुकीच्या घटना
Published on: 

भिवंडी, ता. २५ (बातमीदार) : भिवंडी शहर आणि परिसरात चोरी, आर्थिक फसवणूक आणि मालमत्तेशी संबंधित वादाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. गोदामांतून लाखो रुपयांचा माल व रोख रक्कम चोरीला जाणे, बस प्रवासादरम्यान एका महिलेचे सोन्याचे दागिने चोरीला जाणे, तसेच गुंतवणुकीच्या नावाखाली ६.२० लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय, एका कुटुंबाला त्यांच्या घरातून बेदखल करून त्यांचे सामान चोरल्याचा आरोपही करण्यात आले आहे. संबंधित पोलिस ठाण्यांनी गुन्हे नोंदवून तपास सुरू केला आहे.
भिवंडी-दापोडा रोडवरील वळगाव परिसरातील पारसनाथ कॉम्प्लेक्सच्या सी/१० इमारतीत असलेल्या भगवती स्लॅटर्सच्या (युनिट क्र. ५) गोदामाच्या मागील खिडकीची लोखंडी जाळी तोडून चोरी करण्यात आली. १६-१७ ऑक्टोबरच्या रात्रीच्या सुमारास १.६० लाख रुपयांचा माल चोरीला गेल्याची तक्रार नारपोली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. दुसरीकडे, कोपर येथील आदिनाथ कॉम्प्लेक्समध्ये आर. बी. एंटरप्रायझेसच्या गोदामाचे शटर तोडून तांब्याच्या तारा आणि रोख रक्कम चोरून नेण्यात आली. या घटनेत २,७५,९८५ रुपयांचा मुद्देमाल गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. नारपोली पोलिस या दोन्ही प्रकरणांचा तपास करत आहेत.
अंजूर-दिवे येथील महामार्गावर असलेल्या घाटगे पाटील ट्रान्सपोर्टच्या शाखेतून रेमंड ब्रँडच्या कापडाचे आठ रोल गायब झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मालाची किंमत सुमारे २.४० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. तक्रारदार राजेंद्र इंगळे यांनी व्यंकटेश चव्हाण, मुकेश राठोड आणि भिमु पवार यांच्यावर संगनमत करून हा माल चोरल्याचा आरोप केला आहे. ही घटना २१ ऑगस्ट ते २४ सप्टेंबर या कालावधीत घडल्याचे सांगण्यात येत आहे. नारपोली पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


बसमध्ये महिलेच्या दागिन्यांची चोरी
मुलुंड चेक नाका ते कल्हेरदरम्यान ठाणे महापालिकेच्या बसमधून प्रवास करताना, ५९ वर्षीय महिलेच्या पर्समधून सोनसाखळी आणि पेंडंट चोरीला गेले. तक्रारीनुसार, ही घटना २२ ऑक्टोबरला दुपारी २ ते ३ च्या दरम्यान घडली. यात सुमारे ८० हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. नारपोली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक
कैलासनगरमधील डोंगराळ भागात असलेल्या साई प्रसाद सोसायटीमधून बीजी वेल्थ शेअरिंग नावाची ऑनलाइन गुंतवणूक योजना चालवली जात होती. या योजनेद्वारे पैसे दुप्पट करण्याचे प्रलोभन दाखवून तक्रारदार आणि त्यांच्या नातेवाइकांकडून ६,२०,३२५ रुपये उकळण्यात आले. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, ही रक्कम रोख स्वरूपात आणि ऑनलाइन व्यवहारांद्वारे जमा करण्यात आली होती. याप्रकरणी राजू चव्हाण, कविता चव्हाण, अर्जुन चव्हाण, सुनील चव्हाण, कैलास पाटील आणि सुनीता पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या या आर्थिक व्यवहारांची आणि आरोपींच्या नेमक्या भूमिकेची चौकशी करत आहेत.

बळजबरी घराबाहेर काढून सामान गायब
गबिनगरमधील आनंद टॉकीज परिसरात एका कुटुंबाला त्यांच्या घरातून बळजबरीने बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर घराला कुलूप लावून वस्तू चोरी केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, सोन्याची अंगठी, चांदीचे पैंजण, २७ हजार रुपये रोख, गॅस सिलिंडर, घरातील इतर वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे गायब झाली आहेत. याप्रकरणी अदीव बहाउद्दीनसह पाच नामनिर्देशित व्यक्ती आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नोंदींनुसार, प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर शांतीनगर पोलिसांनी २१ ऑक्टोबरला हा गुन्हा नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com