एलआयजी घरांवरील तोडक कारवाईबाबत दिलासा

एलआयजी घरांवरील तोडक कारवाईबाबत दिलासा
Published on: 

एलआयजी घरांच्या प्रश्नावर तोडग्याची आशा
मंदा म्हात्रेंचा सिडकोकडे पाठपुरावा

तुर्भे, ता. २६ (बातमीदार) : नवी मुंबईतील अल्प उत्पन्न गटातील (एलआयजी) सदनिकांवरील तोडक कारवाईच्या प्रश्नावर रहिवाशांना दिलासा मिळवून देण्यासाठी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सिडको प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. यासंदर्भात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सदनिकाधारकांची बाजू मांडून व्यवहार्य तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली.

सिडकोकडून एलआयजी सदनिकांवर करण्यात येत असलेल्या तोडक कारवाईमुळे अनेक रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आयुष्यभराची कमाई खर्च करून घर घेतलेल्या नागरिकांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी म्हात्रे यांनी यापूर्वी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र देऊन कारवाई थांबविण्याची मागणी केली होती. त्यानंतरही त्यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला.

याच पार्श्वभूमीवर सिडको मुख्यालयात झालेल्या बैठकीत एलआयजी सदनिकाधारकांच्या अडचणी, निवाऱ्याचा प्रश्न आणि कारवाईमुळे निर्माण झालेली अनिश्चितता याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांच्या घरांचा प्रश्न मानवी दृष्टिकोनातून हाताळावा तसेच रहिवाशांचे नुकसान टाळून त्यावर सकारात्मक आणि व्यवहार्य तोडगा काढावा, अशी भूमिका म्हात्रे यांनी मांडली.

या पाठपुराव्यानंतर सिडको प्रशासनाने सकारात्मक पावले उचलल्याचे आमदार म्हात्रे यांच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे एलआयजी सदनिकाधारकांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com