

स्क्रीन टाइमला कलेचा पर्याय; स्वराची भरारी
वयाच्या १३व्या वर्षी रेसिन आर्टमध्ये उमटवला ठसा
वसई, ता. २६ (बातमीदार) : स्वराला वयाच्या पाचव्या वर्षांपासून चित्रकलेची आवड आहे. गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून सातत्याने सराव करत तिने चित्रकलेत कौशल्य मिळवले. गेल्या वर्षभरापासून ती रेसिन आर्ट या हस्तकलेच्या प्रकारातही नवनवीन प्रयोग करत आहे. कुटुंबीयांच्या प्रोत्साहनामुळे तिच्या कल्पकतेला वाव मिळत असून, आई-वडील तिच्या कलाप्रवासाला भक्कम साथ देत आहेत.
मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या आकर्षणात आजची बालपिढी स्क्रीन टाइममध्ये गुरफटत असताना, वसईतील १३ वर्षीय स्वरा निषाद शेट्ये हिने कलेच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.आयझॅक न्यूटन स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकणारी स्वरा चित्रकला आणि रेसिन आर्टमध्ये रमली असून, तिचा सर्जनशील प्रवास बालपिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.रेसिनच्या माध्यमातून स्वरा टी-कोस्टर्स, घड्याळे, देवीची आसने, पूजेच्या थाळ्या, आकर्षक ट्रे, दिवाळीचे आकाशकंदील आणि विविधरंगी कलाकुसर केलेल्या पणत्या अशा वैविध्यपूर्ण कलाकृती तयार करते. दैनंदिन वापरातील वस्तूंना कलात्मक रूप देण्याची तिची हातोटी या कलाकृतींमधून दिसून येते.
स्पर्धा आणि प्रदर्शनांतही चमक
--------------------------
स्वरा केवळ छंद जोपासण्यापुरती मर्यादित न राहता विविध कला स्पर्धा आणि प्रदर्शनांमध्येही सहभागी होत आहे. कलश्री मेगा नॅशनल एक्झिबिशन, रंगाकाशतर्फे सप्टेंबर २०२६ मध्ये आयोजित इंटरनॅशनल आर्ट एक्झिबिशन तसेच विविध सामाजिक संस्थांच्या स्पर्धांमध्ये तिने सहभाग नोंदवून प्रशस्तिपत्रके आणि पारितोषिके मिळवली आहेत. नुकत्याच झालेल्या वसई ट्रेड फेअरमध्ये तिच्या कलाकृतींना वसईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.
मोबाईलच्या आभासी दुनियेत वेळ घालवण्याऐवजी आपल्या आवडीला कौशल्याची जोड देत सर्जनशीलतेचा मार्ग निवडणारी स्वरा आजच्या पिढीसमोर एक आदर्श ठरत आहे. लहान वयातच जिद्द, सातत्य आणि कल्पकतेच्या बळावर स्वतःची ओळख निर्माण करता येते, हे तिने आपल्या कलाप्रवासातून दाखवून दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.