

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात संघटना मजबूत करून विजयासाठी प्रयत्न करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे प्रदेशाध्यक्ष निखिल ठाकरे यांनी केले. तसेच ठाण्यातील पक्षनेतृत्वाला ताकद देण्यासाठी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
ठाण्यातील एन.के.टी. सभागृहात रविवारी (ता. २५) सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. या वेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सूरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला, उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रबोध डावखरे, राष्ट्रीय युवक सरचिटणीस मोहसीन शेख यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. युवक प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ठाणे शहराध्यक्षांची पहिली नियुक्ती केल्याचे सांगत ठाकरे यांनी संघटनात्मक एकजुटीवर भर दिला. प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपली जबाबदारी ओळखून पक्षवाढीसाठी काम करावे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ठाण्यातील पक्षाच्या भवितव्याबाबत चिंता होती; मात्र नजीब मुल्ला यांच्यासारखे नेतृत्व सोबत असल्याने ती दूर झाली, असे ते म्हणाले. या वेळी त्यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.
नजीब मुल्ला यांना बळ देण्याची गरज असून, त्यांना विधान परिषदेवर काम करण्याची संधी मिळावी, अशी मागणी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे करणार असल्याचे प्रदेश सरचिटणीस सूरज चव्हाण यांनी सांगितले.
अजित पवारांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे!
ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी, अजित पवार यांच्या कुटुंबाविषयी असलेल्या प्रेमातून पक्षाची जबाबदारी स्वीकारल्याचे सांगत, काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देणे हा अजित पवार यांचा विचार होता. युवकांनी पक्षासाठी काम करावे. आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. अजित पवार यांनी शेवटच्या भेटीत व्यक्त केलेले स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. कळवा-मुंब्रा विधानसभा निवडणुकीत आपल्याला पराभूत करण्यासाठी प्रयत्न करणारे काही जण आज आपल्यासोबत काम करत असल्याचे सांगत त्यांनी बदलत्या राजकीय समीकरणांकडे लक्ष वेधले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.