स्वागत कमानींचा मुक्काम कायम!

स्वागत कमानींचा मुक्काम कायम!
Published on: 

स्वागत कमानींचा मुक्काम कायम!

नेरूळ-जुईनगरमध्ये महापालिकेचे दुर्लक्ष; नागरिकांची नाराजी

जुईनगर, ता. २६ (बातमीदार) : नवरात्रोत्सव आणि दसरा संपून आठवडा उलटला तरी नेरूळ-जुईनगर परिसरातील रस्त्यांवर उभारलेल्या स्वागत कमानी अद्याप हटविण्यात आलेल्या नाहीत. उत्सव संपला तरी कमानींचा मुक्काम कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. सार्वजनिक रस्त्यांवर उभारलेल्या या तात्पुरत्या रचना हटविण्याची जबाबदारी आयोजक पार पाडत नसताना महापालिका प्रशासनही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

नेरूळ आणि जुईनगर परिसरात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच विविध राजकीय कार्यक्रमांच्या निमित्ताने रस्त्यांवर स्वागत कमानी उभारल्या; मात्र त्या संबंधित कार्यक्रम संपल्यानंतर तातडीने हटविण्याची खबरदारी घेतली जात नसल्याचे चित्र आहे. परिणामी सार्वजनिक रस्त्यांवरील जागा विनाकारण व्यापली जात असून, शहराच्या नियोजनबद्ध स्वरूपालाही बाधा पोहोचत आहे.

उत्सवाच्या नावाखाली कमानी उभारल्या जातात; मात्र कार्यक्रम संपल्यानंतर त्या हटविण्याचा विसर पडतो. कमानींवर आयोजकांची नावे, राजकीय पदाधिकाऱ्यांचे फलक आणि जाहिराती झळकत असतात. त्यामुळे उत्सव संपल्यानंतरही जाहिरातींचा लाभ घेण्यासाठी या कमानी कायम ठेवल्या जात आहेत का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. सार्वजनिक रस्त्यांचा वापर दीर्घकाळ अशा तात्पुरत्या रचनांसाठी होणे योग्य नसल्याची भावना व्यक्त होत आहे.

रस्त्यांवर उभारलेल्या कमानींमुळे काही ठिकाणी वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कमानींची उंची, रस्त्यावरील त्यांची जागा आणि सुरक्षिततेची स्थिती याकडे दुर्लक्ष झाल्यास वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे कमानी वेळेत हटविणे आणि त्यांची सुरक्षितता तपासणे आवश्यक आहे.

शहरातील सार्वजनिक जागा मोकळ्या ठेवण्याची जबाबदारी आयोजकांबरोबरच महापालिका प्रशासनाचीही आहे. कमानी उभारण्यासाठी परवानगी देताना त्या हटविण्याची अंतिम मुदत निश्चित करणे, मुदतीनंतर पाहणी करणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, उत्सव संपूनही कमानी कायम राहत असल्याने परवानगीच्या अटींची अंमलबजावणी होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

उत्सव साजरे करण्यास नागरिकांचा विरोध नाही; मात्र उत्सवाच्या नावाखाली सार्वजनिक रस्ते दीर्घकाळ व्यापले जाऊ नयेत, अशी अपेक्षा आहे. महापालिकेने नेरूळ-जुईनगर परिसरातील कमानींची पाहणी करून त्या तातडीने हटवाव्यात आणि भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी कठोर देखरेख ठेवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com