

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : शहरात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन संशयितांना पोलिसांनी वेगवेगळ्या कारवायांमध्ये अटक केली आहे. शिळ डायघर पोलिसांनी पडलेगाव परिसरात रिक्षातून गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला ताब्यात घेत त्याच्याकडून आठ किलो ६६६ ग्रॅम गांजा जप्त केला, तर ठाणे गुन्हे शाखा, घटक एकच्या पथकाने मुंब्रा येथील रेतीबंदर रोडवर सापळा रचून एमडी (मेफेड्रॉन) क्रिस्टल पावडरसह एका तरुणाला अटक केली. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण १० लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल केला आहे.
शिळ डायघर पोलिस ठाण्यातील हवालदार तेजस परब यांना शनिवारी (ता. २४) पडलेगाव मैदानाजवळील सीएनजी पेट्रोलपंपासमोर गांजाची विक्री करण्यासाठी एक व्यक्ती येणार असल्याची माहिती मिळाली होती. रात्री संशयित शोएब समीम शेख (२४, रा. संजयनगर, मुंब्रा) हा रिक्षातून येताच त्याला ताब्यात घेऊन रिक्षाची झडती घेतली असता, मागील सीटच्या बाजूला काळ्या रंगाच्या बॅगेत आणि निळ्या पिशवीत गांजा आढळला. पाच पाकिटांमध्ये असलेल्या गांजाची किंमत चार लाख ३३ हजार असल्याचे पंचनाम्यात नमूद आहे. याशिवाय मोबाईल आणि रिक्षा असा एकूण पाच लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ठाणे गुन्हे शाखा घटक एकच्या पथकाला मुंब्रा येथील रेतीबंदर रोडवर एमडी विक्रीसाठी एक तरुण येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ग्रँड ऑर्चिड वेडिंग लॉन्ससमोर सापळा रचला. रात्री स्कुटरवरून आलेल्या मोसीन वाहिद खान ऊर्फ पिकाचू (२५, रा. अमृतनगर, मुंब्रा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत २५.५ ग्रॅम एमडी क्रिस्टल पावडर आढळली. त्याची किंमत ७६ हजार ५०० रुपये असल्याचे पंचनाम्यात नमूद आहे. तसेच मोबाईल, वजनकाटा, विक्रीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या, एक हजार रोख आणि दुचाकी असा एकूण एक लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत मोसीन याने हा एमडी पदार्थ आंबिवली येथील स्पायडर नावाच्या व्यक्तीकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. या प्रकरणी मोसीन खान आणि त्याचा कथित साथीदार स्पायडर यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.