

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : मतदार याद्यांच्या पडताळणी प्रक्रियेतील कथित त्रुटी आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करत ठाणे काँग्रेसने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आहे. ‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियानाच्या माध्यमातून मतदारांचे अधिकार आणि लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. एसआयआर प्रक्रिया रद्द करणे, बॅलेट पेपरवर निवडणुका घेणे आणि मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा, अशी भूमिका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निरीक्षक आणि राजस्थानमधील आमदार डॉ. शिखा मील बराला यांनी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.
काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून देशभरात राबविण्यात येणाऱ्या अभियानांतर्गत मतदारांच्या हक्कांबाबत जनजागृती करण्यावर भर दिला जाणार असल्याचे डॉ. बराला यांनी सांगितले. एसआयआर प्रक्रियेत मृत, स्थलांतरित आणि दुबार मतदारांची नावे वगळताना पात्र मतदारांची नावेही यादीतून वगळली जाण्याची भीती असल्याचा दावा त्यांनी केला. मतदार यादीतील त्रुटींमुळे नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू शकतात, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत भाजपच्या फायद्यासाठी आयोगाचा वापर होत असल्याचा दावाही काँग्रेसने केला. या पार्श्वभूमीवर एसआयआर प्रक्रिया रद्द करावी, ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घ्याव्यात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या. या वेळी ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष राहुल पिंगळे, प्रदेश सरचिटणीस गुरविंदर सिंग बच्चर, राज्य पदाधिकारी राजेश जाधव, मोहन तिवारी, डॉ. गजानन देसाई आणि महेंद्र म्हात्रे आदी उपस्थित होते.
रामलीला मैदानावर ठाणेकरांची उपस्थिती
या अभियानांतर्गत १ नोव्हेंबरला दिल्लीतील रामलीला मैदानावर जनआंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात ठाण्यातून शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली. लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी काँग्रेस तसेच इंडिया आघाडीतील घटक पक्षांचा संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.