

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : एल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेसह स्टेम कंपनीमार्फत होणारा पाणीपुरवठा दर बुधवारी २४ तास बंद ठेवण्यात येणार आहे. या निर्णयाची सुरुवात २८ ऑक्टोबरपासून होणार असून, शहरातील अनेक भागांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने एल-निनोच्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत उपलब्ध जलसाठ्याचे काटकसरीने आणि प्राधान्यक्रमाने व्यवस्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचा परिणाम कमी करण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुरक्षित ठेवण्यासाठी पूर्वनियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार ठाणे महापालिकेने पाणीपुरवठ्यात कपात करण्याचे नियोजन केले आहे. महापालिकेच्या नियोजनानुसार, दर बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या काळात पाणीपुरवठा यंत्रणेच्या माध्यमातून १८ तासांचा शटडाऊन घेऊन १० टक्के कपात साध्य करण्याचे नियोजन असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
बुधवारी (ता. २८) सकाळी ९ वाजल्यापासून गुरुवारी (ता. २९) सकाळी ९ वाजेपर्यंत घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतुपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, ईटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा आणि कळव्याच्या काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणीपुरवठा बंद राहण्याच्या कालावधीत नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा आणि पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.
वाढत्या गरजेच्या तुलनेत ही वाढ अपुरी
ठाण्याला पालिकेच्या स्वतःच्या योजनेतून २५० दशलक्ष लिटर, एमआयडीसीकडून १३५ दशलक्ष लिटर, स्टेमकडून ११५ दशलक्ष लिटर आणि मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लिटर पाणी मिळते. घोडबंदर परिसरातील वाढती गरज लक्षात घेऊन मुंबई महापालिकेकडे ५० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात केवळ पाच दशलक्ष लिटर वाढीव पाणी मिळाल्याने माजिवडा-मानपाडा परिसराचा पुरवठा ११५ वरून १२० दशलक्ष लिटर झाला. वाढत्या गरजेच्या तुलनेत ही वाढ अपुरी ठरत असल्याने पाणीपुरवठ्याचे गणित अद्याप सुटलेले नाही.
कुठे किती दैनंदिन पाणीपुरवठा (दशलक्ष लिटर)
माजिवडा-मानपाडा (घोडबंदर) १२०
वर्तकनगर ६५
कळवा ६८
दिवा ६५
मुंब्रा ६८
वागळे इस्टेट ५३
लोकमान्य-सावरकरनगर ४५
उथळसर ५५
नौपाडा ५१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.