

मधमाशीपालनातून उत्पन्नवाढीची संधी
आरसीएफ आणि कृषी विभागाचा संयुक्त उपक्रम; शंभर पेट्यांचे वितरण
अलिबाग, ता. २६ (वार्ताहर) : शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायातून अतिरिक्त उत्पन्न मिळावे, या उद्देशाने आरसीएफ थळ आणि तालुका कृषी अधिकारी, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने मधमाशीपालन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शनिवारी (ता. २४) थळ येथील शेतकरी प्रशिक्षण केंद्रात झालेल्या या उपक्रमात शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन व प्रात्यक्षिकांचा अनुभव देण्यात आला. या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना १०० मधमाशीपालन पेट्यांचे वितरण करण्यात येणार आहे.
आरसीएफच्या सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत आयोजित या प्रशिक्षणात कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथील विषयतज्ज्ञ प्रशांत गावडे आणि संतोष करंजे यांनी मार्गदर्शन केले. मधमाशांच्या वसाहतींची रचना, संगोपन, पेट्या ठेवण्यासाठी योग्य जागेची निवड, वसाहतींचे व्यवस्थापन, नियमित देखभाल आणि मध उत्पादनासाठी आवश्यक तंत्रांची माहिती त्यांनी दिली.
पेट्यांचा योग्य वापर, मधमाशांच्या वसाहतींचे आरोग्य जपणे आणि व्यवसायातील तांत्रिक अडचणी सोडविणे याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांतून माहिती देण्यात आली. अलिबागचे तालुका कृषी अधिकारी तन्मय भगत आणि हिंदराव मोरे यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शेतीपूरक व्यवसायांतून आर्थिक उत्पन्न वाढवावे, असे आवाहन त्यांनी केले.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला पूरक व्यवसायाचे बळ
कार्यक्रमाला आरसीएफ थळचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी डॉ. राकेश कवळे, योगेंद्र भोईर आणि जनसंपर्क अधिकारी सुरेश चौधरी उपस्थित होते. मधमाशीपालनासारख्या व्यवसायातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचा पर्यायी स्रोत उपलब्ध होऊ शकतो. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना नव्या व्यवसायाची माहिती आणि आवश्यक कौशल्ये मिळण्यास मदत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.