

आदिवासी लोककलांना राज्यस्तरीय व्यासपीठ
‘भगवान बिरसा कला संगम २.०’अंतर्गत स्पर्धा
जव्हार, ता. २६ (बातमीदार) : आदिवासी समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन आणि पारंपरिक लोककलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘भगवान बिरसा कला संगम २.०’ या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत शनिवारी (ता. २४) जव्हार येथील प्रगती प्रतिष्ठानमध्ये जिल्हास्तरीय कला स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांमधून आदिवासी लोकसंस्कृतीचे विविध रंग उलगडले. आमदार हरिश्चंद्र भोये यांच्यासह शासकीय व प्रशासकीय अधिकारी आणि कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
पारंपरिक नृत्य, लोकगीते आणि वाद्य वादनाच्या सादरीकरणातून कलाकारांनी आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले. ग्रामीण आणि दुर्गम भागांतील कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच पिढ्यान्पिढ्या जतन झालेल्या लोकपरंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचाव्यात, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबरला साजऱ्या होणाऱ्या ‘जनजातीय गौरव दिना’च्या पार्श्वभूमीवर या आयोजनाला विशेष महत्त्व आहे.
आदिवासी समाजातील पारंपरिक नृत्य, लोकगीते आणि वाद्ये ही केवळ मनोरंजनाची साधने नसून, समाजाचा इतिहास, जीवनशैली आणि निसर्गाशी असलेले नाते व्यक्त करणारा सांस्कृतिक वारसा आहे. बदलत्या काळात या कलांचे संवर्धन करून त्या पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन आणि त्यांच्या कलागुणांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.
‘भगवान बिरसा कला संगम २.०’अंतर्गत उपविभागीय, जिल्हास्तरीय, प्रादेशिक आणि राज्यस्तरीय अशा चार टप्प्यांत स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. उत्कृष्ट कलाविष्कार सादर करणाऱ्या कलाकारांना पुढील फेरीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. पारंपरिक कलांसोबतच डिजिटल माध्यमांतील कलांनाही या उपक्रमात स्थान देण्यात आले आहे.
आदिवासी संस्कृतीचे संवर्धन म्हणजे समाजाची सांस्कृतिक अस्मिता आणि ऐतिहासिक वारसा जपणे होय. अशा उपक्रमांमुळे स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच त्यांच्या कलांना व्यापक प्रसिद्धी मिळण्यास मदत होईल, असे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.