

दिवाळीत मराठी चित्रपटांचा ‘ब्लॅक फ्रायडे’
‘रामायण’च्या प्रदर्शनामुळे चित्रपटगृहांसाठी स्पर्धा; निर्माते-दिग्दर्शकांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
संतोष भिंगार्डे ः सकाळ वृ्त्तसेवा
मुंबई ः ता. २६ ः दिवाळी म्हटलं की, सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असतं. घराघरांत फराळाची रेलचेल, बाजारपेठांमध्ये गर्दी आणि सुट्ट्यांमुळे मनोरंजनाची मेजवानी अनुभवण्याची संधी असते. याच काळात प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी हिंदीसह मराठी चित्रपटसृष्टीतही नव्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची चढाओढ सुरू असते. अनेक निर्माते व दिग्दर्शक या सुट्टीचा फायदा घेण्यासाठी आपला चित्रपट प्रदर्शित करीत असतात, परंतु या वेळी मराठीमध्ये कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही. त्यामुळे दिवाळीच्या धामधुमीत मराठीसाठी शुक्रवार हा ‘ब्लॅक फ्रायडे’ ठरणार आहे.
यंदाच्या दिवाळीत एखादा दमदार मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल, अशी अपेक्षा होती, मात्र यंदा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये एकही मराठी चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याने मराठी चित्रपट
रसिकांच्या पदरी निराशा पडणार आहे. सध्या मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना, सणासुदीच्या महत्त्वाच्या काळातही मराठी चित्रपटांची अनुपस्थिती जाणवत आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी मराठी चित्रपटांसाठी ‘ब्लॅक फ्रायडे’ ठरणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दिवाळीच्या धामधुमीत ‘रामायण’ हा बिग बजेट आणि बिग स्टार्स असलेला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. ‘रामायण’च्या दोन्ही भागांचा मिळून निर्मिती, प्रदर्शन आणि प्रसिद्धीचा एकूण खर्च सुमारे चार हजार कोटी रुपये असून, चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी जगभरातील सुमारे ५९ हजार स्क्रीन्सवर लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यापैकी भारतात सुमारे नऊ हजार, तर परदेशात ५० हजारांहून अधिक स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना असल्याचं सांगितलं जात आहे. हा चित्रपट ५ नोव्हेंबरला जगभरातील चित्रपटगृहांत हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि इंग्रजी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मोठ्या प्रमाणावर हा चित्रपट सगळीकडे प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना चित्रपटगृहे मिळणे कठीण आहे. याच कारणामुळे कोणताही निर्माता व दिग्दर्शक रिस्क घेण्यास तयार नसावा असे दिसते आहे, परंतु दिवाळीसारख्या मोठ्या सणाचा फायदा उचलण्याऐवजी मराठी निर्मात्यांनी व दिग्दर्शकांनी मैदानातून पळ काढला आहे.
सहा चित्रपटांना अपयश
२३ ऑक्टोबरला मराठीमध्ये तब्बल सहा चित्रपट प्रदर्शित झाले, परंतु त्यातील एकाही चित्रपटाला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. यावर्षीची ‘क्रांतिज्योती विद्यालय...मराठी माध्यम’ या चित्रपटाने सुरू केलेली यशाची परंपरा त्यानंतर राजा शिवाजी, तुंबाडची मंजुळा, देऊळ बंद २ या चित्रपटांनी कायम राखली होती, परंतु गेल्या दोनेक महिन्यांमध्ये एकाही मराठी चित्रपटाला प्रेक्षकांनी म्हणावी तशी साथ दिली नाही. सध्या मराठीमध्ये अपयशाची मालिका सुरू आहे आणि आता येणारे चित्रपट कशी काय कामगिरी करतात, याकडे मराठी इंडस्ट्रीचे लक्ष लागले आहे.
दिवाळीच्या काळात मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी निर्माते, दिग्दर्शक आणि वितरकांनी आधीपासूनच नियोजन करायला हवं होतं. यंदा दिवाळीत एकही मराठी चित्रपट प्रदर्शित होत नाही, हे दुर्दैवच. मी स्वतः ‘धूमधडाका’, ‘दे दणादण’, ‘धडाकेबाज’ यांसारखे चित्रपट दिवाळीत प्रदर्शित केले होते आणि त्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
– महेश कोठारे, ज्येष्ठ अभिनेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.