पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबाचा २४ तासांचा अल्टिमेटम

पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबाचा २४ तासांचा अल्टिमेटम
Published on: 

पूर्णेकर कुटुंबीयांचे उपमुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन
मीनाक्षी शिंदे यांच्या अटकेची मागणी, २४ तासांची मुदत

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : शिवसेनेचे (ठाकरे गट) विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला २६ दिवस उलटूनही अपेक्षित तपास होत नसल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मीनाक्षी शिंदे यांना २४ तासांत अटक न झाल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा कुटुंबीयांनी दिला आहे. तसेच, सध्याच्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) तपासावर विश्वास नसल्याचे सांगत तपास अधिकारी बदलण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कुटुंबीयांनी आज केली आहे.
प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर, पत्नी खुशबू पूर्णेकर आणि भाऊ जयनाथ पूर्णेकर यांनी पत्रकार परिषदेत हत्येच्या दिवसाचे कथित व्हिडिओ आणि छायाचित्रे सादर केली. हेल्मेट घालून आलेली व्यक्ती राजा शिंदे असल्याचा दावा राम पूर्णेकर यांनी केला, तर नितेश पवार याने गोळीबार केल्याचा आरोप खुशबू पूर्णेकर यांनी केला. पोलिसांना पुरावे देऊनही कारवाई होत नसल्याबद्दल कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणातील अमित सिंह याला आरोपी म्हणून पुढे केले जात असल्याचा आरोपही राम पूर्णेकर यांनी केला.
प्रदीप पूर्णेकर यांची हत्या पूर्वनियोजित असल्याचा आरोप जयनाथ पूर्णेकर यांनी केला. तपासावर राजकीय दबाव आहे का, असा सवाल उपस्थित करत वरिष्ठांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली. कथित छायाचित्रे आणि व्हिडिओच्या आधारे तपासाच्या निष्पक्षतेबाबतही कुटुंबीयांनी शंका व्यक्त केली.
सध्याच्या तपासावर समाधान नसल्याने एसआयटीचे अधिकारी बदलून तपास नव्या अधिकाऱ्यांकडे सोपवावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली. मीनाक्षी शिंदे यांना २४ तासांत अटक न झाल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यात येईल, असा पुनरुच्चारही त्यांनी केला. दरम्यान, पत्रकार परिषदेत करण्यात आलेल्या आरोपांबाबत पोलिसांची अधिकृत बाजू उपलब्ध झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com