

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : शहरात सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या कामांमुळे हवेच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक आज (ता. २६) १२२ वर पोहोचला. त्यामुळे शहरातील हवेची नोंद मध्यम प्रदूषित अर्थात पिवळ्या गटात झाली आहे. विशेष म्हणजे ऑक्टोबरमधील २६ दिवसांपैकी १० दिवस हवेचा गुणवत्ता निर्देशांक १००च्या पुढे राहिला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणाच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांच्या परिणामकारकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
ऑक्टोबरच्या सुरुवातीला १ तारखेला हवेचा गुणवत्ता निर्देशांक ५० होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी तो १२० वर पोहोचला. त्यानंतर ३ ते २१ ऑक्टोबरदरम्यान निर्देशांक प्रामुख्याने ७३ ते १०२ या मर्यादेत राहिला. २२ ऑक्टोबरला निर्देशांक १०४ नोंदविण्यात आला. २५ ऑक्टोबरला तो १२० वर, तर २६ ऑक्टोबरला १२२ वर पोहोचला. महिन्याच्या सुरुवातीच्या तुलनेत हवेच्या गुणवत्तेत झालेली ही घसरण चिंताजनक मानली जात आहे. ठाणे शहरात सध्या मेट्रो मार्गिका, रस्ते, सेवा रस्ते आणि अन्य पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. या कामांदरम्यान उडणारी धूळ, बांधकाम साहित्याची वाहतूक आणि रस्त्यांवर साचणारी माती यांमुळे प्रदूषणात भर पडण्याची शक्यता आहे. त्यातच विविध मार्गांवरील वाहतूक कोंडीमुळे वाहनांचे उत्सर्जन वाढत असल्याने हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.
प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ठाणे महापालिकेने बांधकामस्थळांवरील धूळ नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करणे, रस्त्यांची धुलाई करणे आणि बांधकामांच्या ठिकाणी धूळ उडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, अलीकडील काळात प्रदूषणाचा निर्देशांक वाढत असल्याने या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, याबाबत तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
महिन्यात १० दिवस प्रदूषणाची पातळी वाढली
ठाणे महापालिका क्षेत्रात १ ते २६ ऑक्टोबरदरम्यान १० दिवस हवेचा गुणवत्ता निर्देशांक १००च्या पुढे नोंदविण्यात आला. या काळात शहरातील हवेची गुणवत्ता मध्यम प्रदूषित राहिली. २६ ऑक्टोबरला निर्देशांकाने १२४ची पातळी गाठली. गेल्या काही दिवसांतील ही वाढ शहरातील वायुप्रदूषण नियंत्रणासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित करते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.