

मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला डिसेंबरचा मुहूर्त
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या ठाणेकरांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गायमुख ते कॅडबरी जंक्शन या मेट्रो मार्गिका क्रमांक ४च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन डिसेंबरमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर घोडबंदर मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मेट्रो मार्गिका क्रमांक ४ आणि ४ अ यांची एकूण लांबी ३५.२० किलोमीटर असून, या मार्गावर ३२ स्थानकांचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे ठाणे, मुंबई आणि पूर्व-पश्चिम उपनगरांतील प्रवाशांना आधुनिक सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ कमी होण्याबरोबरच इंधनाची बचत आणि वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणात घट होण्याची अपेक्षा आहे.
वाहतूक सुविधांसोबतच ठाण्यातील पर्यटनस्थळांच्या विकासावरही भर देण्यात येत आहे. नांगला बंदर चौपाटी परिसराचा पर्यटन केंद्र म्हणून विकास करण्यात येत असून, गायमुख चौपाटी आणि कान्होजी आंग्रे स्मारकाच्या माध्यमातून या परिसराला नवी ओळख मिळवून देण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पांसाठी सुमारे २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तथा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेतून हाती घेण्यात आलेल्या या कामांमुळे ठाण्यातील पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
-----------
दोन वर्षांत ठाण्याचे रूप पालटणार
मेट्रो आणि पर्यटन प्रकल्पांमुळे शहराच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. आधुनिक वाहतूक व्यवस्था, पर्यटनस्थळांचा विकास आणि पायाभूत सुविधांचे बळकटीकरण यांचा समन्वय साधून ठाण्याचा सर्वांगीण विकास करण्यावर भर दिला जात आहे. पुढील दोन वर्षांत ठाणे शहराचे विकसित आणि आकर्षक रूप नागरिकांना पाहायला मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.