

भाववाढीतही दिवाळीचा सुकामेवा ‘गोड’!
पिस्ता-बदाम महागले; दिवाळीच्या भेटवस्तूंचे पाकीट झाले हलके
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : दिवाळीच्या फराळात आणि भेटवस्तूंच्या पाकिटात आवर्जून स्थान असलेल्या सुकामेव्याच्या भावात यंदा वाढ झाली आहे. पिस्ता, बदाम आणि खजुराच्या किमती वाढल्याने दिवाळीची खरेदी महागली असली, तरी सणासाठी सुकामेवा घेण्याची मुंबईकरांची परंपरा कायम आहे, मात्र वाढत्या किमतींचा परिणाम खरेदीच्या प्रमाणावर दिसत असून, लहान पाकिटे आणि तुलनेने स्वस्त प्रकारांना ग्राहक पसंती देत आहेत.
मस्जिद बंदर येथील घाऊक बाजारात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुकामेव्याच्या खरेदीला वेग आला आहे. काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड आणि खजुराला मागणी आहे, मात्र महागाईमुळे काही ग्राहक कमी प्रमाणात खरेदी करत आहेत. कॉर्पोरेट कंपन्यांकडूनही दिवाळी भेटवस्तूंच्या पाकिटांबाबत चौकशी सुरू असून, भेटवस्तू बसविण्यासाठी पाकिटांचे वजन कमी करण्याचा कल दिसत आहे. अमेरिकेतील उत्पादनातील घट आणि माल पाठविण्यातील विलंब यामुळे उपलब्धतेवर परिणाम झाला आहे. खजूरसाठी भारत मोठ्या प्रमाणात मध्यपूर्वेतील बाजारपेठांवर अवलंबून आहे. या भागातील वाढलेला तणाव, इंधन व वाहतूक खर्च आणि आयात खर्चामुळे खजुराच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे यंदा सुकामेव्याच्या बाजारात ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
सुकामेव्याच्या किमती वाढण्यामागे आयात खर्च, वाहतूक शुल्क, पुरवठ्यातील अडथळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता ही प्रमुख कारणे असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. भारतातील सुकामेव्याची गरज मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून असल्याने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारावर होत आहे. त्यात रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्याने आयातदारांचा खर्चही वाढला आहे.
कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिवाळी भेटवस्तूंच्या पाकिटांसाठी चौकशी सुरू आहे, मात्र वाढलेल्या भावामुळे कंपन्या पाकिटाचे वजन कमी करत आहेत किंवा महाग प्रकारांऐवजी तुलनेने स्वस्त सुकामेव्याचा समावेश करत आहेत. काजूची किंमत इतर काही प्रकारांच्या तुलनेत स्पर्धात्मक असल्याने त्याची मागणी टिकून आहे. अक्रोड आणि अंजीर यांचाही भेटवस्तूंसाठी विचार केला जात आहे, असे मुंबईचे व्यापारी सांगतात.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, मालाच्या पुरवठ्यातील अडथळे, वाढलेले मालवाहतूक शुल्क आणि रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत होणे यामुळे सुकामेव्याच्या किमती वाढल्या आहेत. कंपन्या खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी भोपळा, कलिंगड, सूर्यफूल आणि चिया बियांसारख्या पर्यायांकडे वळत आहेत. या बियांच्या भेटवस्तूंच्या मागणीत गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे ३० टक्के वाढ झाली आहे.
मस्जिद बंदर येथील ‘ॐ ड्राय फ्रूट’चे मालक सुरेश शहा यांच्या मते “महागाईचा परिणाम ग्राहकांच्या खरेदीवर दिसत असला, तरी सणासाठी काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड आणि खजूर घेण्याची परंपरा कायम आहे.”
दिवाळीत अनेकांना सुकामेवा भेटस्वरूपात वाटायचा असतो, पण आता खरेदी करताना विचार करावा लागत आहे.
- ज्योती विनायक कोकणे, ग्राहक
आता सर्वच गोष्टी महागल्या आहेत. सुकामेवा सुरुवातीला आरोग्यासाठीसुद्धा चांगला असतो म्हणून खरेदी केला जायचा, पण आता दिवाळीसाठी खरेदी करणेही महाग झाले आहे.
- नम्रता डोळस, गृहिणी
सुकामेव्याचे घाऊक भाव (रुपये प्रतिकिलो)
काजू : ८८० ते १,१००
बदाम : ८०० ते १,१२०
पिस्ता : ३,००० ते ३,६००
अक्रोड : १,००० ते २,४००
इतर सुकामेवा व सुकी फळे : ३६० ते ७२०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.