

मलेरिया, डेंगीचा मुंबईला विळखा कायम!
सामूहिक उपाययोजनांची गरज; स्थिर पाण्याचे साठे, बांधकामांमुळे डासांची पैदास
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : मुंबईत मलेरिया आणि डेंगीच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना केवळ वैयक्तिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाय करून या आजारांना आळा घालणे कठीण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. डासांची पैदास रोखण्यासाठी स्थिर पाण्याचे साठे नष्ट करणे, बांधकामांच्या ठिकाणी नियमित तपासणी करणे आणि परिसराची स्वच्छता राखणे यासाठी सामूहिक पातळीवर प्रभावी उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
शहरातील वाढत्या बांधकामांमुळे विविध ठिकाणी पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे. हे डासांच्या पैदाशीसाठी पोषक ठरत आहे. डास नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या धुरळणीच्या औषधांच्या गुणवत्तेबाबतही काही लोकप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केले आहेत. संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी उपाययोजना करताना शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करण्याची गरज असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. डासांच्या जीवनचक्राचा विचार करून डासांची पैदास होणारी ठिकाणे नष्ट करण्याची नियमित कार्यपद्धती असणे आवश्यक आहे. सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात अन्नवाटप होत असल्याने निर्माण होणारा कचरा, अस्वच्छता आणि झोपडपट्टी परिसरातील स्वच्छतेचा अभाव याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
पावसाळ्यानंतर मंद वारे, वाढलेली आर्द्रता, बांधकामांचे वाढते प्रमाण आणि वातावरणात प्रदूषक अडकून राहण्याच्या स्थितीमुळे हवेची गुणवत्ता खालावत आहे. पीएम २.५ आणि पीएम १० या अतिसूक्ष्म कणांचा फुप्फुसांवर परिणाम होतो. पीएम २.५ कण रक्तप्रवाहातही पोहोचून शरीरात दाह निर्माण करू शकतात.
मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला तसेच हृदय, फुप्फुस किंवा मधुमेहाचे आजार असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. अधिक प्रदूषण असलेल्या भागातून प्रवास करताना योग्य प्रकारे बसणारा एन-९५ मास्क वापरावा. धुरक्याचे प्रमाण अधिक असताना सकाळी मैदानी व्यायाम किंवा चालणे टाळावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
स्थिर पाण्याच्या तक्रारींवर लक्ष
पालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांनी सांगितले की, ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात सप्टेंबरच्या तुलनेत डासांमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण कमी झाले आहे. स्थिर पाण्याबाबत येणाऱ्या तक्रारींची तातडीने दखल घेतली जात आहे. बांधकामांच्या ठिकाणी डासांची पैदास होणारी ठिकाणे शोधून ती नष्ट करण्यासाठी कामगारांना प्रशिक्षण दिले जात आहे. शहरातील विविध भागांत धुरळणीची कार्यवाहीही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रदूषणामुळे श्वसनविकारात वाढ
दरम्यान, मलेरिया आणि डेंगीबरोबरच मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. प्रदूषणामुळे खोकला, घरघर, घशात आणि डोळ्यांत जळजळ तसेच श्वास घेण्यास त्रास होण्याच्या तक्रारी वाढत आहेत. दमा आणि दीर्घकालीन श्वसनविकार असलेल्या रुग्णांना त्याचा अधिक त्रास होत असल्याचे जे. जे. रुग्णालयातील छातीविकार तज्ज्ञ डॉ. रोहित हेगडे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.