

घाटकोपरकर बांधकामांच्या धुळीने त्रस्त
तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी
घाटकोपर, ता. २७ (बातमीदार) ः पंतनगर भागात गेल्या चार वर्षांपासून इमारतींची शेकडो बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात सिमेंटच्या धुळीचे प्रदूषण होऊन नागरिकांना याचा त्रास होत आहे, तर दुसरीकडे याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात अशी निवेदने पालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिली आहेत, मात्र अद्याप याबाबत कार्यवाही झालेली नाही, अशी माहिती नागरिकांनी दिली.
दिल्लीपेक्षाही मुंबईतील प्रदूषण अधिक असल्याचे उच्च न्यायालयाने सुनावल्यानंतर आता मुंबईतील प्रदूषणावर गांभीर्याने चर्चा होऊ लागली आहे. दिल्लीप्रमाणे मुंबईतही उपाययोजना करावी, अशी सूचना केली जात आहे. मुंबईतील वाढती बांधकामे, मेट्रोचे जाळे, उड्डाणपूल, रस्त्यांची कामे आणि बांधकाम साहित्याची वाहतूक यांमुळे मुंबईतील धूळ प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
घाटकोपरमधील वाढती बांधकामे ही धूळ आणि प्रदूषणास जबाबदार असल्याचे सांगून याबाबत पालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला २०२३ पासून निवेदने देऊन जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे माजी उपविभागप्रमुख प्रकाश वाणी यांनी दिली. त्यांनी सायन येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाला ६ नोव्हेंबर २०२३, १ डिसेंबर २०२५ रोजी पत्र दिले आहे. याबाबत अद्याप पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.
घाटकोपर पूर्वेकडील अनेक ठिकाणी प्रदूषणाची पातळी वाढत आहे. बांधकामांच्या ठिकाणचे सिमेंट रस्त्यांवर पडून ऐन सकाळच्या वेळी आणि रात्रीच्या गर्दीच्या वेळी वाहनांमुळे ते नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दमा तसेच श्वसनाचे आजार असलेले नागरिक यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. पंतनगर येथील नागरिकांनी केलेल्या तक्रारीत घाटकोपर परिसरात गेल्या काही वर्षांपासून वायूप्रदूषणाची पातळी वाढल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे वायुप्रदूषणाचे मोजमाप वाढवून अद्ययावत अहवाल जाहीर करावा, बांधकामस्थळांवर धूळ नियंत्रणावरील नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी तपासणी वाढवावी, कचरा जाळण्यावर कठोर कारवाई करण्यासाठी स्थानिक प्रशासनाला सूचना द्याव्यात, वाहतूक पोलिसांसोबत एकत्रितपणे धूर नियंत्रणासाठी नियमित वाहन तपासणी आणि जागरूकता मोहिमा राबवाव्यात, आवश्यक असल्यास पर्यावरण स्वच्छता मोहीम व धूळ नियंत्रण उपाययोजना तातडीने सुरू कराव्यात या मागण्यांही केल्या आहेत
दंडात्मक कारवाई करणार
याबाबत आम्ही सर्व बांधकाम करणारांना नोटीसा दिल्या आहेत. आणखी दुसरी नोटीस देत आहोत. सात दिवसांत पालिकेच्या नियमानुसार उपाययोजना न केल्यास दंडात्मक कारवाई करणार आहोत, अशी प्रतिक्रिया एन विभागाचे सहाय्यक आयुक्त जयदीप मोरे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.