‘टेंडर वॉर’मुळे विकासकामांना खीळ

‘टेंडर वॉर’मुळे विकासकामांना खीळ
Published on: 

अंबरनाथ, ता. २७ (वार्ताहर) : शहरातील विकासकामे रखडण्यामागे ‘टेंडर वॉर’ कारणीभूत असल्याचा दावा महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे. कमी दराने निविदा भरूनही कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांमुळे विकासकामांचा दर्जा आणि गती दोन्हीवर परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला. याप्रकरणी काही कंपन्यांच्या दहा वर्षांतील कामांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालिका प्रशासनाला आवश्यक निर्देश दिल्याची माहिती महायुतीच्या नेत्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

अंबरनाथ नगरपालिकेतील निविदा प्रक्रियेत काही ठेकेदारांकडून ४० ते ५० टक्के कमी दराने निविदा भरल्या जात आहेत. कमी दरामुळे कामांचा दर्जा राखला जात नाही. तसेच, कार्यादेश मिळूनही काही ठेकेदार कामे सुरू करत नसल्याची तक्रार नगरसेवकांनी केली होती. यासंदर्भात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३० नगरसेवकांनी संबंधित कंपन्यांच्या कामांची चौकशी करून कारवाईची मागणी केली होती. तक्रारींच्या पार्श्वभूमीवर डॉ. शिंदे यांनी २४ ऑक्टोबरला अंबरनाथमधील नगरसेवकांची संयुक्त बैठक घेतली. त्यानंतर सोमवारी महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी पालिकेत पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील आपली भूमिका स्पष्ट केली. काही बाहेरील ठेकेदारांकडून कमी दराने निविदा भरून विकासकामे रखडविली जात आहे. संबंधित कंपन्यांच्या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे गटनेते रवींद्र करंजुले यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील, भाजपचे गटनेते अभिजित करंजुले पाटील, ज्येष्ठ नगरसेवक अब्दुल शेख, प्रदीप पाटील, नगरसेवक उपस्थित होते.

संस्थांच्या लेखापरीक्षणावर प्रश्न
प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागासाठी ५० लाख रुपयांचा निधी देऊनही प्रत्यक्षात विकासकामे दिसत नसल्याचे नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी सांगितले. विकासकामे रखडविणाऱ्या ठेकेदार कंपन्यांच्या मागे अदृश्य शक्ती असून अंबरनाथच्या विकासात अडथळे निर्माण करणाऱ्या घटकांना बाजूला करण्याचे निर्देश डॉ. शिंदे यांनी दिल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच कामांचा दर्जा निकृष्ट असतानाही त्रयस्थ संस्थेचा ऑडिट अहवाल समाधानकारक येत असेल, तर अशा संस्थांच्या लेखापरीक्षणावरही प्रश्न उपस्थित केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com