कांदा नरमला; बटाटा-लसणाचा ठसका वाढला!

कांदा नरमला; बटाटा-लसणाचा ठसका वाढला!
Published on: 

बटाटा-लसणाचा ठसका वाढला!
जुईनगर, ता. २७ (बातमीदार) : राज्यावर दुष्काळाचे सावट आणि सर्वसामान्यांना महागाईच्या झळा बसत असतानाच आता स्वयंपाकघरातील महत्त्वाचे पदार्थही महाग होऊ लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या कांद्याच्या भावाला अखेर काहीसा विराम मिळाला असला, तरी बटाटा आणि लसणाच्या भावाने मात्र पुन्हा वरची दिशा पकडली आहे. एपीएमसीच्या घाऊक बाजारात बटाट्याच्या भावात किलोमागे सुमारे पाच रुपयांची वाढ झाली असून, लसणाचे भाव २३० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत.
एपीएमसीच्या कांदा-बटाटा बाजारात मंगळवारी (ता. २७) सुमारे १५० गाड्यांची आवक झाली. त्यापैकी बटाटा आणि लसणाच्या जवळपास ५० गाड्या बाजारात दाखल झाल्या. बाजारात नव्याने दाखल होऊ लागलेल्या तळेगावच्या बटाट्याला चांगला भाव मिळत असल्याने भावात वाढ झाल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी घाऊक बाजारात १५ ते २० रुपये प्रतिकिलो भावाने मिळणारा बटाटा आता २० ते २५ रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. त्यामुळे किलोमागे सुमारे पाच रुपयांची वाढ झाली आहे. बटाटा हा बहुतांश घरांमध्ये दररोज वापरला जाणारा पदार्थ असल्याने या भाववाढीचा परिणाम थेट ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.
बटाट्यापाठोपाठ लसणाच्या भावातही वाढ झाली आहे. गेल्या काही काळापासून तुलनेने स्थिर असलेल्या लसणाच्या किमती आता वाढू लागल्या आहेत. घाऊक बाजारात पूर्वी १५० ते २२० रुपये प्रतिकिलो भावाने मिळणारा लसूण आता १९० ते २३० रुपये प्रतिकिलो भावाने विकला जात आहे. लसणाचा वापर रोजच्या स्वयंपाकात मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्याच्या भाववाढीचा परिणाम गृहिणींच्या बजेटवर होत आहे. यंदा राज्यातील अनेक भागांत पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. काही भागांमध्ये पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांना दुष्काळसदृश परिस्थितीचाही सामना करावा लागत आहे. त्यामुळे भाजीपाला आणि इतर कृषिमालाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, मात्र सध्या बाजारात दिसणारी भाववाढ पुढील किती काळ कायम राहील, याचा अंदाज बांधणे व्यापाऱ्यांनाही कठीण जात आहे.


कांदा नरमला
काही दिवसांपूर्वी ५० रुपये प्रतिकिलोचा टप्पा ओलांडलेल्या कांद्याच्या भावात सध्या काहीशी नरमाई आली आहे. घाऊक बाजारात कांदा ३५ ते ४५ रुपये प्रतिकिलो भावाने विकला जात आहे. त्यामुळे कांद्याच्या भाववाढीने त्रस्त ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

सध्या चांगल्या मालाची कमी आवक झाल्याने भाववाढ झाली आहे. त्यात दुष्काळ परिस्थितीमुळे थोडेफार भाववाढीचे संकेत दिसत आहेत, मात्र येत्या काही दिवसांत नवीन मालाची आवक झाल्यास भाव आटोक्यात राहतील.
- मनोहर तोतलानी, कांदा बटाटा व्यापारी

राष्ट्रीय बाजार एपीएमसी घाऊक भाव (प्रतिकिलो)
कांदा ३५ ते ४५
बटाटा २१ ते २५
लसूण १६० ते २३०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com