

समुद्रकिनारा विकासावरून राष्ट्रवादीची नाराजी
महिला स्टॉलधारकांच्या उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर
श्रीवर्धन, ता. २७ (वार्ताहर) : श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याच्या विकासकामांदरम्यान मेटकर्णी परिसरातील महिला स्टॉलधारकांवर झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन शहर राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. समुद्रकिनाऱ्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘ब्ल्यू फ्लॅग’ मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या विकासकामांना पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व असले, तरी स्थानिक स्टॉलधारकांच्या उपजीविकेच्या प्रश्नाकडेही संवेदनशीलतेने पाहणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
श्रीवर्धन समुद्रकिनारा स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवणे हे ‘ब्ल्यू फ्लॅग’ मानांकनाच्या निकषांनुसार आवश्यक आहे. या अनुषंगाने विकासकामे आणि संबंधित कारवाई सुरू आहे. या उपक्रमामुळे पर्यटनाला चालना मिळण्यासह स्थानिकांना रोजगार व व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे, मात्र विकास प्रक्रियेत स्थानिक व्यावसायिकांचे हित आणि त्यांच्या उपजीविकेचा विचार होणेही गरजेचे आहे, अशी भूमिका संघटनेने मांडली.
या प्रकरणात वन विभागाची प्रशासकीय प्रक्रिया आणि संबंधित कायदेशीर तरतुदी स्पष्ट होण्यासाठी संबंधित विभागाने अधिकृत माहिती द्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. विकासकामांबाबतची वस्तुस्थिती आणि स्थानिकांच्या अडचणी यांचा समतोल साधून प्रश्न सोडविण्यावर संघटनेने भर दिला.
चौकट :
तटकरेंच्या सन्मानाचा मुद्दाही चर्चेत
पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या भेटीदरम्यान एका महिला स्टॉलचालकाने प्रसारमाध्यमांसमोर आपली बाजू मांडताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता. या प्रकाराबाबत श्रीवर्धन शहर राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेने नाराजी व्यक्त केली. सार्वजनिक जीवनात मतभेद मांडताना परस्परांचा सन्मान राखून संयमित भाषेचा वापर करावा, अशी भूमिका संघटनेने मांडली. तसेच, या प्रकरणाचे वृत्तांकन करताना प्रसारमाध्यमांनी सर्व संबंधित बाजू मांडून वस्तुस्थितीचे संतुलित चित्र नागरिकांसमोर ठेवावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.