आठवड्याऐवजी दररोज पाणीकपात?

आठवड्याऐवजी दररोज पाणीकपात?
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : एल निनोच्या पार्श्वभूमीवर ठाणे पालिकेने शहरातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी दर आठवड्यातील बुधवारी २४ तास पाणी बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. मात्र, त्यानंतर दोन दिवस कमी दाबाने पाणी मिळत असल्याने ठाणेकरांना सलग तीन दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आठवड्यातून २४ तासऐवजी दररोज १० टक्के पाणीकपात करून पुरवठा सुरू ठेवण्याच्या पर्यायाची प्रशासनाकडून चाचपणी सुरू आहे. याबाबत स्टेम प्राधिकरणाशी चर्चा करण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली.

ठाणे शहराची पाण्याची दैनंदिन गरज ६२१ दशलक्ष लिटरवरून वाढून सुमारे ६३७ दशलक्ष लिटरवर पोहोचली आहे. मात्र, प्रत्यक्षात दररोज सुमारे ५९० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होत असल्याने मागणी आणि पुरवठ्यातील अंतर ४७ दशलक्ष लिटरपर्यंत वाढले आहे. त्यातच एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने १० टक्के पाणीकपातीचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे उपलब्ध पाण्यावरील ताण आणखी वाढण्याची भीती आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार ठाणे शहर, घोडबंदर आणि वागळे इस्टेट परिसरात दर बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.

पाणीपुरवठा बंद ठेवल्यानंतर जलवाहिन्यांमधील दाब पूर्ववत होण्यासाठी एक ते दोन दिवस लागतात. त्यामुळे पाणीबंदीचा एक दिवस आणि त्यानंतर कमी दाबाने होणारा पुरवठा, अशा परिस्थितीत नागरिकांना सलग तीन दिवस अपुऱ्या पाण्यावर अवलंबून राहावे लागू शकते. या समस्येवर पर्याय म्हणून दररोज उपलब्ध पाण्यात १० टक्के कपात करून नियमित पुरवठा सुरू ठेवण्याचा विचार प्रशासनाकडून केला जात आहे. त्यामुळे एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात पाणीसाठा करण्याची गरज कमी होण्याबरोबरच पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहण्याची वेळही टाळता येऊ शकते.

स्टेमसोबत चर्चेनंतर निर्णय
ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेबरोबरच स्टेम कंपनीमार्फतही शहराला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे दररोज कपात लागू करण्यापूर्वी दोन्ही यंत्रणांमधील समन्वय, उपलब्ध पाण्याचे प्रमाण आणि वितरण व्यवस्थेची क्षमता यांचा विचार करावा लागणार आहे. यासाठी स्टेम प्राधिकरणाशी चर्चा सुरू असून व्यवहार्य पर्याय निश्चित झाल्यानंतर पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

आठवड्यातून एकदा २४ तास पाणीपुरवठा बंद आणि त्यानंतर पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी मिळत असल्याने नागरिकांना सलग तीन दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. ही समस्या लक्षात घेऊन २४ तास पाणीबंदीऐवजी दररोज १० टक्के पाणीकपात करण्याच्या पर्यायाचा विचार सुरू आहे. यासाठी स्टेम प्राधिकरणाशी चर्चा करण्यात येत आहे.
- प्रशांत रोडे, अतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com