

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर व गारेगार तसेच पर्यावरणपूरक असा व्हावा, यासाठी ठाणे पालिकेच्या परिवहन उपक्रमास पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत मंजूर झालेल्या १०० बसपैकी ९८ बस उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, या बस चालकांअभावी गेल्या दीड महिन्यांपासून कोलशेत आगारात उभ्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना या सेवेचा लाभ मिळू शकलेला नाही. ठाणेकरांचे अधिक सुखकर व गारेगार प्रवासाचे स्वप्न भंगले आहे.
ठाणे शहराची लोकसंख्या २७ लाखांपुढे गेली असून, सार्वजनिक वाहतुकीसाठी बसची मागणी वाढत आहे. सध्या टीएमटीच्या ताफ्यात ४०७ बस असून, त्यापैकी सुमारे ३७० ते ३८० बस प्रत्यक्ष रस्त्यावर धावतात. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता बसची संख्या वाढविणे आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. मात्र, नव्या बस दाखल होऊनही त्या प्रवासी सेवेत उतरवता येत नसल्याने नियोजनातील त्रुटी समोर आल्या आहेत.
पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत दाखल झालेल्या ९८ बसपैकी ५५ बसची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. बसच्या संचालनासाठी ठेकेदाराची नियुक्तीही करण्यात आली आहे. तरीही चालक उपलब्ध होत नसल्याने बसगाड्या आगारातच उभ्या आहेत. त्यामुळे बस उपलब्ध करून देण्याबरोबरच त्या नियमितपणे चालविण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची व्यवस्था करण्याचे आव्हान टीएमटीसमोर उभे राहिले आहे.
चालक मिळण्याचे आव्हान
चालकांची कमतरता भासण्यामागे वेतन आणि राहणीमानाचा खर्च ही प्रमुख कारणे असल्याचे सूत्रांनी सांगितले. ठेकेदारामार्फत नियुक्त होणाऱ्या चालकांना सुमारे ३१ हजार रुपये वेतन दिले जाते. विविध कपातींनंतर त्यांच्या हातात जवळपास २४ हजार रुपये मिळतात. ठाण्यातील घरभाडे आणि दैनंदिन खर्च लक्षात घेता हे वेतन अपुरे पडत असल्याने चालकांकडून या नोकरीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितले जाते.
बसची संख्या वाढणार
टीएमटीच्या ताफ्यात आगामी काळात आणखी बस दाखल होणार आहेत. सरकारच्या निधीतून, पीएम ई-बस सेवा तसेच १५व्या वित्त आयोगाच्या योजनेंतर्गत एकूण ४०३ ई-बस उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. त्यापैकी १२३ बस यापूर्वीच ताफ्यात दाखल झाल्या आहेत. याशिवाय, जीसीसी पद्धतीने १०० सीएनजी बस घेण्याची प्रक्रिया सुरू असून, दहा डबलडेकर बसही खरेदी करण्यात येत आहेत. या डबलडेकर बस घोडबंदर ते ठाणे मार्गावर चालविण्यात येत आहेत.
पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत मंजूर झालेल्या १०० वातानुकूलित ई-बसपैकी ९८ बस उपलब्ध झाल्या आहेत. या बसच्या संचालनासाठी ठेकेदार नियुक्त करण्यात आला असून, बस प्रवासी सेवेसाठी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची आहे. याबाबत ठेकेदाराला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
- भालचंद्र बेहरे, व्यवस्थापक, ठाणे महापालिका परिवहन सेवा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.