उरणच्या मुख्याधिकाऱ्यांना १५ हजारांचा जामीन

उरणच्या मुख्याधिकाऱ्यांना १५ हजारांचा जामीन
Published on: 

उरणच्या मुख्याधिकाऱ्यांना जामीन
शेतकऱ्यांची भरपाई थकविल्याने न्यायालयाचे समन्स
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २७ ः उरण नगरपालिकेच्या बायपास रस्ता रुंदीकरणासाठी अधिग्रहित जमिनीचा मोबदला वेळेत न देणे आणि कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन केल्याप्रकरणी उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी समीर जाधव यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. याप्रकरणी उरण न्यायालयाने जाधव यांच्याविरुद्ध प्रक्रिया लागू करून हजर होण्याचे समन्स बजावले होते. त्यांना याप्रकरणी न्यायालयाकडून वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन घ्यावा लागला आहे.
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. उरण येथील बोरीपखाडी भागातील सर्वेक्षण क्रमांक १७५/२ मधील जमीन उरण नगरपालिकेच्या बायपास रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अधिग्रहित करण्यात आली होती. यामुळे सिडको बायपास व उरण-मोरा रस्ता जोडला जाणार होता. पनवेलचे उपविभागीय अधिकारी यांनी २० ऑगस्ट २०२४ मध्ये या जमिनीचे भूसंपादन निवाडा जाहीर करून सुमारे १३ कोटी रुपयांची भरपाई निश्चित केली होती. तीन महिन्यांत ही रक्कम जमा करणे नगरपालिकेवर बंधनकारक होते. मात्र, मुदत संपून दोन वर्षे उलटूनही आणि उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी स्मरणपत्रे पाठवूनही नगर परिषदेने कोणतीही भरपाई दिली नाही. याशिवाय, माहिती अधिकारात योग्य माहिती न देणे, मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित रिट याचिकेत उत्तर न नोंदवणे आणि वाहतूक दुसरीकडे वळवणार नाही, असे आश्वासन देऊनही रस्त्याचे उद्‍घाटन करून वाहतूक सुरू करणे, असे गंभीर आरोप बाधित जमीनमालक अरुण मधुसूदन पोडवाल यांनी केले आहेत.
---------------------------------------------------
न्यायालयीन कारवाई व जामीन
मोबदला न मिळाल्याने आणि कायद्याचे उल्लंघन झाल्याने जमीनमालक अरुण पोडवाल यांनी उरण न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली. न्यायालयाने पुराव्यांची व प्रतिज्ञापत्राची पडताळणी करून २६ मे रोजी मुख्याधिकारी समीर जाधव यांच्याविरुद्ध कारवाईचे आदेश दिले. न्यायालयाच्या समन्सनंतर मुख्याधिकारी न्यालयात हजर झाले. ३० जूनला न्यायालयाने त्यांना जामिन घेण्यास सांगितले होते. मात्र तेव्हापासून जाधव न्यायालयात हजर राहत नव्हते. अखेर आज त्यांनी हजर राहून १५ हाजर रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करून घेतली. याची पुढील सुनावणी २४ नोव्हेंबरला होणार आहे. तसेच, पर्यायी रस्ता व स्टे ऑर्डरबाबत पनवेल आणि उरण न्यायालयात समांतर याचिकांवर सुनावण्या सुरू आहेत, अशी माहिती वकील अभिजित पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com