

भिवंडी, ता. २८ (बातमीदार) : भिवंडी शहरासह ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात घरे, सदनिका, दुकाने, हॉटेल, फार्महाऊस आणि अन्य मालमत्ता भाड्याने देताना किंवा विक्री करताना संबंधितांची माहिती स्थानिक पोलिस ठाण्यात देणे बंधनकारक करण्यात आले आहे. मालमत्ता भाड्याने दिल्यानंतर सात दिवसांच्या आत ही माहिती सादर करावी लागणार आहे. ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी याबाबत आदेश जारी केले असून, १४ डिसेंबरपर्यंत संबंधित मालमत्ताधारकांनी माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. विहित मुदतीत माहिती ऑनलाइन अथवा प्रत्यक्ष सादर न केल्यास संबंधितांवर कारवाई होऊ शकते.
ठाणे ग्रामीण पोलिस जिल्ह्याच्या कार्यक्षेत्राला कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर आणि उल्हासनगर यांसारख्या शहरांची जोड आहे. या परिसरात औद्योगिक वसाहती, गोदामे आणि मालसाठवण केंद्रे मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे नोकरी, व्यवसाय आणि अन्य कामांसाठी बाहेरील राज्यांतून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. यापैकी अनेक जण परिसरात घरे, सदनिका आणि दुकाने भाड्याने घेऊन राहतात किंवा व्यवसाय करतात.
काही मालमत्ताधारक भाडेकरूंच्या ओळखीची खातरजमा न करता तसेच आवश्यक कागदपत्रे न घेता मालमत्ता भाड्याने देतात. याशिवाय, भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलिस ठाण्याला कळवली जात नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत गुन्हेगारी कारवाया, अवैध व्यवसाय आणि समाजविघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी संबंधितांची माहिती अद्ययावत ठेवण्याच्या उद्देशाने हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
तरतुदींचे पालन करणे आवश्यक
आदेशानुसार, जिल्ह्यातील संबंधित पोलिस ठाणे आणि महसूल विभागाच्या कार्यक्षेत्रात मालमत्ता भाड्याने देताना घरमालक, भाडेकरू, गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष तसेच मालमत्ता व्यवहारातील मध्यस्थांनी आवश्यक माहिती सादर करणे अपेक्षित आहे. ही माहिती ऑनलाइन किंवा संबंधित पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष जाऊन देता येणार आहे. त्यामुळे मालमत्ता भाड्याने देताना अथवा विक्री करताना संबंधितांनी आदेशातील तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.