

भिवंडी, ता. २८ (बातमीदार) : पावसाळा लवकर संपल्याने पाणीसाठ्यात घट झाली असून, स्टेम प्राधिकरणाकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. परिणामी भिवंडी शहरातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. सुमारे १२ लाख लोकसंख्या असलेल्या शहराला दररोज १८० एमएलडी पाण्याची आवश्यकता असताना प्रत्यक्षात ११५ एमएलडी पाणी मिळत आहे. त्यामुळे दररोज ६५ एमएलडी पाण्याची तूट निर्माण होत आहे. टंचाईग्रस्त भागांना दिलासा देण्यासाठी महापालिकेकडून पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
भिवंडी शहरासाठी स्वतंत्र धरण बांधून पाणीसाठ्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन चार दशकांपासून दिले जात आहे. मात्र, ही योजना अद्याप प्रत्यक्षात आलेली नाही. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पटनवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराला स्टेम प्राधिकरणाकडून ७३ एमएलडी, तर मुंबई महापालिकेकडून ४२ एमएलडी पाणी मिळते. या दोन्ही स्रोतांमधून मिळणारे एकूण पाणी ११५ एमएलडी असून, आवश्यकतेच्या तुलनेत ६५ एमएलडीची कमतरता आहे. याशिवाय, वऱ्हाळादेवी तलावातून दररोज पाच एमएलडी पाणी मिळत होते. मात्र, तलावातील प्रदूषण आणि अस्वच्छतेमुळे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने २७ मार्चपर्यंत तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यास बंदी घातली आहे. त्यातच स्टेम प्राधिकरणाकडून सहा एमएलडी पाणीपुरवठा कमी करण्यात आला आहे.
पाणीटंचाई असलेल्या भागांमध्ये महापालिकेच्या तीन टँकरसह भाड्याने घेतलेल्या दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय मुंबई महापालिकेकडे दररोज अतिरिक्त पाच एमएलडी पाणी देण्याची मागणी करण्यात आली आहे. वऱ्हाळादेवी तलाव पुन्हा सुरू झाल्यास शहरातील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
लोकसंख्येच्या तुलनेत पुरवठा कमी
शहराच्या हद्दीत आसपासच्या गावांचा समावेश झाला. मोठ्या इमारती आणि झोपडपट्ट्यांची संख्या वाढल्याने पाण्याची मागणीही वाढली. शहराच्या परिसरातील वनविभागाच्या तसेच सरकारी जमिनींवर अतिक्रमण होऊन सुमारे २८ झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाणीपुरवठ्याची व्यवस्था सक्षम न झाल्याने टंचाईची समस्या अधिक तीव्र झाली आहे.
हातपंप, विहिरींचीही दुरवस्था
शहरात पाण्याचे पर्यायी स्रोत उपलब्ध असले, तरी त्यांची स्थितीही चिंताजनक आहे. महापालिकेच्या माहितीनुसार, शहरातील ९०३ हातपंपांपैकी सुमारे २५० बंद आहेत. २६० जेट पंपांपैकी ३५, तर १,२४० बुडविलेल्या विद्युत पंपांपैकी ६२ बंद आहेत. शहरातील ११४ पायऱ्यांच्या विहिरींपैकी ८६ विहिरी कचऱ्याने तुंबल्या आहेत, तर उर्वरित २८ विहिरींमधील पाणी पिण्यायोग्य नसल्याचे सांगण्यात आले. त्यातच पाणीचोरी आणि गळतीमुळे दररोज सुमारे २० टक्के पाणी वाया जात असल्याने उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.