

ठाणे, ता. २८ (बातमीदार) : मराठी रंगभूमीवरील आपल्या दिग्दर्शनाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांना यंदाच्या ‘गंधार गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे. बालनाट्य चळवळीला प्रोत्साहन देणाऱ्या गंधार संस्थेच्या वतीने १४ नोव्हेंबर रोजी बालदिनाचे औचित्य साधून गडकरी रंगायतन येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. यंदा या सोहळ्याचे ११ वे वर्ष असून, ज्येष्ठ दिग्दर्शक राजन ताम्हाणे आणि साहित्यिक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी पत्रकार परिषदेत पुरस्काराची घोषणा केली.
तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या गंधार बालकलाकार पुरस्कारासाठी श्रीजय देशपांडे याची निवड करण्यात आली आहे. यंदाच्या युवा पुरस्कारासाठी साजिरी जोशी, आकाश सूर्यवंशी आणि संग्राम समेळ यांची निवड झाली आहे. पुण्यातील कलाकेंद्र या संस्थेला बालनाट्य संस्था पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, संस्थेचे प्रमुख संतोष माकुडे आहेत. पुण्यातील महाराष्ट्रीय कलोपासक (पुरुषोत्तम करंडक) यांना आयोजन समिती पुरस्कार, डॉ. जे. बी. भोर यांना कार्यरत्न पुरस्कार, तर प्रशांत निगडे निर्मित ‘माकडचाळे’ या बालनाट्याला लक्षवेधी बालनाट्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
मेमध्ये ‘गंधार’तर्फे विविध जिल्ह्यांत बालनाट्य स्पर्धा घेण्यात आली होती. ठाणे, मुंबई, नाशिक आणि पुणे येथील २३ बालनाट्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. भालचंद्र कुबल आणि चंद्रशेखर पाटील यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. या स्पर्धेतील नामांकनांची घोषणाही करण्यात आली. या वेळी ‘गंधार’चे प्रा. मंदार टिल्लू, सुनील जोशी, वैभव पटवर्धन, पी. एन. पाटील, चंद्रकांत थोरात, संतोष गावडे आणि पल्लवी टिल्लू उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.