

महागाईमुळे पणत्यांचा प्रकाश मंदावला
दरात १० ते २० टक्क्यांची वाढ; माती, वाहतूक आणि मजुरीचा खर्च वाढल्याने खरेदीला कात्री
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः दिवाळीचा सण जवळ येताच पारंपरिक मातीच्या पणत्यांपासून नक्षीकाम केलेल्या सजावटीच्या दिव्यांपर्यंत विविध पर्याय बाजारपेठांमध्ये उपलब्ध होऊ लागले आहेत. मात्र, यंदा पणत्यांच्या किमतीत १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे काही ग्राहकांनी नवीन पणत्यांच्या खरेदीस कात्री लावत जुन्याच पणत्या पुन्हा वापरण्याचा निर्णय घेतल्याची परिस्थिती आहे.
दिवाळी आणि पणत्या यांचे अतूट नाते आहे. घराचे अंगण, खिडक्या, सज्जे आणि देवघर पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघते. पूर्वी साध्या मातीच्या पणत्यांना प्राधान्य दिले जात होते. आता मात्र पारंपरिकतेसोबत आधुनिक सजावटीची जोड मिळाल्याने पणत्यांचे स्वरूपही बदलले आहे. कमळ, मोर, शंख, हत्ती, स्वस्तिक आणि तुळशी वृंदावनाच्या आकारातील दिव्यांसह कुंदन, मोती, टिकल्या आणि चमकदार खड्यांनी सजवलेल्या पणत्या बाजारात दाखल झाल्या आहेत. विशेषतः महिलांकडून अशा सजावटीच्या पणत्यांची चौकशी केली जात आहे.
हंडी, लामणदिवे, नारळाच्या आकारातील दिवे, वॉल हँगिंग, पाण्यावर तरंगणाऱ्या पणत्या, मेणाचे दिवे, काचेचे दिवे आणि एलईडी पणत्यांनाही बाजारात स्थान मिळाले आहे. मॅजिक व मॅग्नेटिक फ्लोटिंग कॅंडल्ससह विविध आकारांतील समया ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. सजावटीच्या मोठ्या दिव्यांच्या किमती दोन हजार रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना आकर्षक सजावट आणि खिशाला परवडणारी खरेदी यांचा मेळ साधावा लागत आहे.
मातीचे वाढलेले दर, वाहतूक खर्च आणि कारागिरांची मजुरी यामुळे पणत्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. दिवाळीत कपडे, फराळ, पूजासाहित्य आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठीही खर्च होत असल्याने ग्राहकांना खरेदीचे बजेट सांभाळावे लागत आहे. त्यामुळे यंदा आवश्यक तेवढ्याच पणत्या खरेदी करण्यासह मागील वर्षीच्या पणत्यांचा पुनर्वापर करण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे चित्र आहे.
महागाईमुळे मागील वर्षीच्या पणत्या स्वच्छ करून पुन्हा वापरणार आहोत. गरजेनुसार काही नवीन पणत्या घेऊ; मात्र अनावश्यक खर्च टाळणार आहोत.
- अपर्णा यादव, ग्राहक
यंदा पणत्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. काही ग्राहक बजेटनुसार खरेदी करीत आहेत. दिवाळी जवळ येत असल्याने पुढील दिवसांत विक्री वाढेल, अशी अपेक्षा आहे.
- नीरज कुमार, विक्रेते, दादर
पणत्यांचे दर
- साध्या मातीच्या लहान पणत्या : प्रति डझन २५ ते ४० रुपये,
- नक्षीकाम केलेल्या पणत्या : नग ५० ते २,००० रुपये
- कमळ, मोर, शंख व तुळशी वृंदावन आकारातील दिवे : नग ४० ते १५० रुपये,
- चार पणत्यांचा संच : १२० रुपये
- हत्तीच्या आकारातील दिवा : नग ३५० रुपये
- मेणाच्या पणत्या (चारचा संच) : ६० ते १५० रुपये
- अखंड दिवे : ३० ते १५० रुपये
- तरंगणारे दिवे : संच ८० ते २०० रुपये
- प्लॅस्टिक व फॅन्सी पणत्या : डझन १०० ते १८० रुपये
- एलईडी पणत्या : नग ४० रुपये, संच १५० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.