डोल्हारीत वाचनसंस्कृतीला बळ

डोल्हारीत वाचनसंस्कृतीला बळ
Published on: 

डोल्हारीत वाचन संस्कृतीला बळ

‘रूम टू रीड’चा शैक्षणिक उपक्रम

विक्रमगड, ता. २८ (बातमीदार) : आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय विकसित करणे, भाषिक कौशल्ये समृद्ध करणे आणि स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता वाढवणे महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर शाळेत उभारण्यात आलेले बाल वाचनालय विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे नवे दालन ठरणार आहे. विविध स्तरांतील पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार वाचनाची संधी मिळणार असून, त्यातून शब्दसंग्रह, वाचनगती, आकलनशक्ती आणि अभिव्यक्ती कौशल्ये विकसित होण्यास मदत होणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून त्यांच्या ज्ञानकक्षा रुंदावण्यासाठी विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा, डोल्हारी खुर्द येथे रूम टू रीड इंडिया ट्रस्टच्या सहकार्याने उभारलेल्या आदर्श बाल वाचनालयाचे उद्‍घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा उर्मिला गुणगुणा यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या वाचनकौशल्यासह आकलनशक्ती आणि कल्पनाशक्तीला चालना मिळणार आहे.

उद्‍घाटनानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि पालकांनी वाचनालयाची पाहणी करून पुस्तकांची मांडणी व व्यवस्थापनाची माहिती घेतली. विद्यार्थ्यांना नियमित वाचनाची सवय लागावी, यासाठी पालक आणि शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतः केलेली आकर्षक सजावट आणि रांगोळीने कार्यक्रमात विशेष रंग भरला.

मुख्याध्यापक संजय आयरे आणि शिक्षकांच्या सहकार्याने हा उपक्रम साकारण्यात आला. या वेळी रूम टू रीड इंडिया ट्रस्टचे प्रकल्प जिल्हा सहाय्यक नितीन रोकडे, प्रीतेश इजांकर आणि विक्रमगड तालुका समन्वयक नितेश वाघ उपस्थित होते. शाळा, पालक आणि ग्रामस्थांच्या सहभागातून वाचन संस्कृती रुजविणारे हे वाचनालय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com