

हत्येचा उद्देश अद्याप अस्पष्टच
‘उद्देशाशिवाय दोषारोपपत्र शक्य नाही’, सहपोलिस आयुक्तांची कबुली
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर हत्या प्रकरणात महिनाभराच्या तपासानंतरही हत्येमागील नेमका उद्देश स्पष्ट झालेला नाही. या प्रकरणात ठोस खुलासे होण्याची अपेक्षा असताना, बुधवारी सकाळी तातडीने बोलावलेल्या ठाणे पोलिसांच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत अटक, शस्त्रजप्ती आणि तपासाच्या प्राथमिक घडामोडींची माहिती देण्यात आली. हत्येचा उद्देश मात्र अद्याप अस्पष्ट असल्याने पत्रकार परिषदेत महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरितच राहिले. त्यामुळे या पत्रकार परिषदेचा ‘फुसका बार’ झाल्याची चर्चा सुरू झाली.
ठाणे शहर पोलिस दलाचे गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त पंजाबराव उगले यांनी हत्येचा उद्देश अद्याप स्पष्ट झाला नसल्याचे सांगितले. आरोपींची ओळख परेड घेण्यासाठी न्यायालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच हत्येमागील उद्देश निश्चित झाल्याशिवाय दोषारोपपत्र सादर करता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे तपासातील पुढील महत्त्वाचा टप्पा आणि हत्येच्या कारणांचा शोध याकडे लक्ष लागले आहे.
राम पूर्णेकर यांच्या माहितीनुसार तपास
प्रदीप पूर्णेकर यांचे सुपुत्र राम पूर्णेकर यांनी दिलेल्या माहितीनुसारही तपास सुरू असल्याचे उगले यांनी सांगितले. कुटुंबीयांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने पोलिस तपास करीत असल्याचे या माहितीवरून स्पष्ट झाले. दरम्यान, अटकेच्या वेळी पाचवा आरोपी अमित सिंग ऊर्फ पपलू याने एसटीएफ पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिल्याचेही उगले यांनी सांगितले. मात्र, हत्येचा उद्देश आणि आरोपींच्या भूमिकांबाबत ठोस निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही.
१२ साक्षीदारांनी नोंदवली साक्ष
पूर्णेकर हत्येतील १२ साक्षीदारांसह महत्त्वाचे म्हणजे राम पूर्णेकर, जयनाथ पूर्णेकर आणि अन्य महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. साक्षीदार, शस्त्रे, परिस्थितीजन्य पुरावे, घटनास्थळावरील पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या सखोल तपासानंतर पुढील दिशा ठरविणार असल्याची माहिती उगले यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.