जोगेश्वरीत बालशस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा

जोगेश्वरीत बालशस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा
Published on: 

जोगेश्वरीत बालशस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा
दर बुधवारी तपासणी, शुक्रवारी शस्त्रक्रिया; सायन रुग्णालयाच्या सहकार्याने सेवा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : जोगेश्वरी पूर्वेतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात बालशस्त्रक्रिया सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात २६ ऑक्टोबर रोजी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. निरंजन क्षीरसागर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत सायन रुग्णालयातील बालशस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. पारस कोठारी, सहाय्यक प्राध्यापक डॉ. ऑड्रे पायस यांच्यासह भूलशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, बालरोग आणि सर्वसाधारण शस्त्रक्रिया विभागातील डॉक्टर उपस्थित होते.
या निर्णयानुसार, दर बुधवारी ट्रॉमा केअर रुग्णालयातील बालरोग बाह्यरुग्ण विभाग क्रमांक १०५ मध्ये बालशस्त्रक्रियेसाठी रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. त्याच दिवशी भूलतज्ज्ञांकडून शस्त्रक्रियेपूर्व तपासणी केली जाईल. रुग्णांच्या आवश्यकतेनुसार लघवीची तपासणी, संपूर्ण रक्तचित्र (सीबीसी) आणि छातीचा क्ष-किरण अशा तपासण्या करण्यात येतील. त्यानंतर दर शुक्रवारी ऑपरेशन थिएटर क्रमांक ३ किंवा ५ मध्ये बालशस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. शुक्रवारी सकाळी दिवसातील पहिली शस्त्रक्रिया बालशस्त्रक्रिया विभागाची असेल, तर शस्त्रक्रियेनंतरची तपासणी बुधवारी बाह्यरुग्ण विभागात केली जाईल.
शस्त्रक्रियेसाठी दाखल होणाऱ्या बालरुग्णांना संबंधित विभागांतर्गत महिला शस्त्रक्रिया कक्ष किंवा बालरोग वॉर्डमध्ये दाखल केले जाईल. बालशस्त्रक्रियेसाठी आवश्यक उपकरणांच्या निर्जंतुकीकरणाची व्यवस्था रुग्णालयात करण्यात येणार आहे. यासाठी सायन रुग्णालयातून निर्जंतुक उपकरणांचे दोन ड्रम आणले जाणार असून, दर गुरुवारी उपकरणांचे निर्जंतुकीकरण केले जाईल.

नियमित सेवा उपलब्‍ध होणार
दरम्यान, शस्त्रक्रियेनंतर काही गुंतागुंत निर्माण झाल्यास संबंधित रुग्णाला पुढील उपचारांसाठी सायन रुग्णालयात हलवण्यात येईल. तसेच भूल देण्यापूर्वीच्या तपासणीत शस्त्रक्रियेसाठी अयोग्य किंवा गुंतागुंतीची स्थिती असलेले रुग्ण पुढील तपासणी आणि उपचारांसाठी सायन रुग्णालयात पाठवले जाणार आहेत. या व्यवस्थेमुळे जोगेश्वरी परिसरातील बालरुग्णांना बालशस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात नियमित सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com