

महापालिका कार्यालयाबाहेर झाडांवर कुऱ्हाड
नागरिकांकडून चौकशीची मागणी
उल्हासनगर, ता. २९ (वार्ताहर) : नागरिकांना ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक चारच्या कार्यालयाबाहेरच तीन ते चार जिवंत झाडे तोडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, उपमहापौर अमर लुंड यांच्या प्रभाग क्रमांक १७ मध्ये ही वृक्षतोड झाल्याने महापालिकेच्या पर्यावरण संवर्धनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वृक्षतोडीला परवानगी कोणी दिली, याबाबत नागरिकांनी प्रशासनाकडे स्पष्टीकरण मागितले आहे.
प्रभाग समिती क्रमांक चारच्या कार्यालयाच्या संरक्षक भिंतीलगत असलेली हिरवीगार झाडे तोडण्यात आल्याने परिसरातील रहिवासी आणि दुकानदारांनी आश्चर्य व्यक्त केले. नाल्याच्या बांधकामात अडथळा येत असल्याने झाडे तोडली असावीत, असे कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने सुरुवातीला सांगितले, मात्र नंतर या प्रकरणाची माहिती नसल्याचे सांगत त्याने भूमिका बदलली. त्यामुळे वृक्षतोडीमागील नेमके कारण आणि त्यासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली होती का, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच उपमहापौर अमर लुंड यांनी कॅम्प पाचमधील भाटिया रुग्णालयाजवळील रस्ता दुभाजकावर वृक्षारोपण उपक्रमाचा शुभारंभ केला होता. प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहनही त्यांनी केले होते, मात्र त्यांच्याच प्रभागातील महापालिका कार्यालयाबाहेर जिवंत झाडे तोडण्यात आल्याने वृक्षारोपणाच्या आवाहनाशी प्रत्यक्ष कृतीचा मेळ बसतो का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वृक्षारोपणाबरोबरच अस्तित्वातील झाडांचे संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे या वृक्षतोडीची चौकशी करून परवानगी देण्यात आली होती का, याची माहिती जाहीर करावी आणि नियमांचे उल्लंघन झाले असल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
झाडे तोडली कोणी?
प्रभाग समिती क्रमांक चारच्या कार्यालयाबाहेरील तीन ते चार जिवंत झाडे तोडण्यात आली, मात्र वृक्षतोडीसाठी परवानगी घेण्यात आली होती का, याबाबत स्पष्टता नाही. नाल्याच्या बांधकामासाठी झाडे तोडली असावीत, असे कर्मचाऱ्याने सुरुवातीला सांगितले; नंतर माहिती नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे वृक्षतोडीची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.