

३० कोटींच्या गार्डनच्या देखभालीकडे दुर्लक्ष
झाडांना पाणी देण्यास टाळाटाळ; ठेकेदाराच्या चौकशीची मागणी
रोहा, ता. २९ (बातमीदार) ः रोहे शहरातील कुंडलिका नदीकिनारी सुमारे ३० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले नदी संवर्धन गार्डन, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि गडकिल्ल्यांच्या प्रतिकृतींनी साकारलेली शिवसृष्टी यामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे, मात्र गेल्या आठवडाभरापासून येथील झाडांना पाणी दिले जात नसल्याचा मुद्दा रोहा सिटिझन फोरमचे अध्यक्ष नितीन परब यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे या परिसराच्या देखभालीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या परिसराच्या देखभाल व दुरुस्तीचा वार्षिक ठेका आमडोशी येथील खासगी कंपनीला देण्यात आला आहे. ऑक्टोबरमधील कडक उन्हात झाडांना नियमित पाणी देणे आवश्यक असताना संबंधित ठेकेदाराकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मोठ्या खर्चातून उभारलेल्या या परिसराची देखभाल नियमानुसार केली जात आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणे एवढ्यापुरताच त्यांच्या विचारांचा सन्मान मर्यादित नसून, परिसरातील वृक्षसंपदा आणि सार्वजनिक मालमत्तेचे जतन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. महाराजांच्या नावाने उभारलेल्या परिसरातील झाडे पाण्याअभावी सुकत असतील, तर ही गंभीर बाब असल्याचे परब यांनी म्हटले आहे.
या प्रकरणी रोहा-अष्टमी नगरपालिकेने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित ठेकेदाराच्या कामाची चौकशी करावी. देखभालीत निष्काळजी आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी आणि आवश्यक असल्यास ठेका रद्द करावा, अशी मागणी परब यांनी केली आहे.
सार्वजनिक मालमत्तेच्या जतनाचा प्रश्न
शिवरायांच्या नावाने उभारलेल्या वास्तूचे सौंदर्य केवळ देखाव्यापुरते मर्यादित न राहता, तेथील वृक्षसंपदा आणि जनतेच्या पैशातून निर्माण झालेल्या मालमत्तेचे योग्य जतन व्हावे, अशी अपेक्षा रोहा सिटिझन फोरमने व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.