

डोंगरमाथ्यावर डेब्रिजखोरीमुळे फटका!
गाळ काढण्यावर महापालिकेला कोट्यवधींचा खर्च
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ः मुंबई आणि उपनगरांतून नवी मुंबईतील तुर्भे येथील टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील (सी-ब्लॉक) डोंगर भागात बेकायदा व छुप्या पद्धतीने डेब्रिज, गाळ आणि चिखल आणून टाकला जात आहे. या बेकायदा डेब्रिजमाफियांच्या कृत्यामुळे एमआयडीसी परिसरातील अनेक उद्योग धोक्यात आले असून, पावसाळ्यात येथे झालेल्या भूस्खलनामुळे कंपन्यांच्या पहिल्या मजल्यापर्यंत गाळ व मलबा शिरून प्रचंड नुकसान झाले होते. याप्रकरणी पोलिसांत गुन्हे दाखल होऊनही डेब्रिज माफियांवर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही; मात्र दुसरीकडे, या माफियांनी निर्माण केलेल्या संकटाची सावरासावर करण्यासाठी पालिका करदात्यांच्या तिजोरीतून तब्बल एक कोटी ९४ लाख रुपयांची उधळपट्टी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
गुरुवारी (ता. २९) पार पडलेल्या पालिकेच्या स्थायी समितीच्या पटलावर आलेल्या विषयपत्रिकेवरून हा गंभीर प्रकार समोर आला आहे. तुर्भे टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट नं. ३६ (लॉटस ऑरॉनिट), प्लॉट नं. ३७ (एक्स वेजी प्रा.लि.), प्लॉट नं. ३८/३९ (अर्क फ्युजन इंडिया प्रा.लि.), प्लॉट नं. ४० (आर. के. इंडस्ट्रिज), प्लॉट नं. ४१ (जे. के. ट्रान्स्पोर्ट) आणि प्लॉट नं. ४२ (सिंड्रो सुविधा) या कंपन्यांच्या परिसरात १ जून २०२६ रोजी डोंगरावरून मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन चिखल, कचरा आणि मलबा थेट पहिल्या मजल्यापर्यंत साचला होता. या दुर्घटनेला निसर्गाचा कोप दाखवण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी प्रत्यक्षात डोंगरमाथ्यावर बेकायदा पद्धतीने टाकण्यात आलेला डेब्रिज आणि गाळच या भूस्खलनाला कारणीभूत ठरला आहे. माफियांच्या या बेकायदा धंद्यामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पांघरूण घालण्यासाठी महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ३४ आणि महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ च्या कलम ६७ (३) (क) चा आधार घेत काम हाती घेतले. तुर्भे शांतीनगर क्वारी परिसरात पोकलेन, डंपर आणि मनुष्यबळाचा वापर करून दगड-मातीचे संरक्षक बांध घालणे, खोदाई करणे आणि गाळ काढण्याचे काम मे. रिलायन्स कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराला सोपवण्यात आले. या कामासाठी १८ टक्के जीएसटीसह एकूण एक कोटी ९४ लाख २१ हजार ४२६ रुपये इतका अवाढव्य खर्च करण्यात आला असून आता या खर्चाला स्थायी समितीची कार्योत्तर मंजुरी मिळवण्यासाठी हा विषय विषयपत्रिकेवर आणला गेला आहे. महापालिकेच्या या मेहेरबानीमुळे माफियांचे धाडस अधिकच वाढले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी माफियांकडूनच या १.९४ कोटी रुपयांची वसुली करावी, अशी संतप्त मागणी आता तुर्भे एमआयडीसी परिसरातून केली जात आहे.
डेब्रिजमाफियांना अभय
या प्रकरणाची पोलिसांत तक्रारी होऊनही मूळ डेब्रिजमाफियांवर आणि त्यांना अभय देणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. माफिया बेकायदा गाळ आणून डोंगर पोखरतात, त्यामुळे भूस्खलन होऊन उद्योजकांचे कोट्यवधींचे नुकसान होते. शेवटी त्यांचा आर्थिक भुर्दंड पालिका प्रशासन करदात्या जनतेच्या डोक्यावर मारते, असाच प्रकार या संपूर्ण कारभारातून उघड झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.