

बायोमेट्रिक आदेशाला केराची टोपली
१११ ग्रामपंचायतींची अंमलबजावणीकडे पाठ
टोकावडे, ता. ३० (बातमीदार) : ग्रामपंचायत अधिकारी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहावेत, यासाठी बायोमेट्रिक किंवा जीपीएस प्रणालीद्वारे हजेरी नोंदविण्याचे आदेश असतानाही मुरबाड तालुक्यात या आदेशाची अंमलबजावणीच होत नसल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील १२६ ग्रामपंचायतींपैकी केवळ १५ ग्रामपंचायतींनी याबाबत अंमलबजावणी सुरू केली असून, तब्बल १११ ग्रामपंचायतींनी अद्याप त्याकडे पाठ फिरली आहे. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून लक्ष वेधले आहे.
ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये अधिकारी नियमित उपस्थित राहावेत आणि नागरिकांची शासकीय कामे वेळेत व्हावीत, या मागणीसाठी वामन किसन खाकर यांनी २८ सप्टेंबर २०२६ला पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्या वेळी प्रशासनाने बायोमेट्रिक अथवा जीपीएस प्रणाली लागू करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेतले. दरम्यान, आश्वासन देऊनही प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
यासंदर्भात पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी २६ ऑक्टोबरला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. त्यामध्ये आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या ग्रामपंचायतींची माहिती देण्यात आली आहे.
नागरिकांची गैरसोय
ग्रामपंचायत ही ग्रामीण भागातील नागरिकांसाठी शासकीय कामकाजाचे महत्त्वाचे केंद्र आहे. विविध दाखले, प्रमाणपत्रे, करवसुली आणि पाणीपुरवठ्यासारख्या कामांसाठी नागरिकांना ग्रामपंचायतीत जावे लागते. मात्र, अधिकारी वेळेवर उपस्थित नसल्यास नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे हजेरी प्रणाली लागू करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासन काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कारवाईची मागणी
बायोमेट्रिक हजेरीबाबत लेखी आश्वासन देऊनही १११ ग्रामपंचायतींनी आदेशाचे पालन केलेले नाही. ही गंभीर बाब असून, जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी आणि सर्व ग्रामपंचायतींमध्ये हजेरी प्रणाली लागू करावी, अशी मागणी वामन किसन खाकर यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.