अजितदादांच्या नावाने कर्ज योजना

अजितदादांच्या नावाने कर्ज योजना
Published on: 

अजितदादांच्या नावाने कर्ज योजना
परशुराम महामंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय
बदलापूर, ता. ३० (बातमीदार) : परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेला स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाकडे सादर करण्यास महामंडळाच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार योजनेचे प्रस्तावित नाव ‘स्व. अजितदादा पवार वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना’ असे असणार आहे. महामंडळाच्या दुसऱ्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

महामंडळाचे अध्यक्ष तथा मंत्री दर्जा प्राप्त कॅप्टन आशीष दामले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या वेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महामंडळाची प्रलंबित कामे कालमर्यादेत पूर्ण करण्याबरोबरच सर्व योजनांची माहिती मराठी आणि इंग्रजी भाषेत अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचे निर्देश या वेळी देण्यात आले.

महामंडळाच्या विविध योजनांसाठी सध्या असलेली १८ ते ४५ वर्षांची वयोमर्यादा १८ ते ५५ वर्षे करण्याच्या शक्यतेचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी अन्य आर्थिक विकास महामंडळांच्या योजनांचा अभ्यास करून पुढील बैठकीत सविस्तर प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. मात्र, वयोमर्यादा वाढविण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. महामंडळाच्या कामकाजासाठी आवश्यक निधी मिळविण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचेही ठरले आहे.
पौराहित्य, वैदिक कर्मकांड आणि धार्मिक समारंभांशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय झाला. यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून १५ दिवसांत शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. या माध्यमातून संबंधित व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.