

जामिनावर सुटताच पुन्हा अमली पदार्थांचा धंदा
चार पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : वारंवार अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या इरफान अलीम सय्यद (४४) या सराईताला ठाणे पोलिसांनी दणका दिला आहे. जामिनावर बाहेर आल्यानंतरही तस्करी सुरूच ठेवल्याने त्याला पिटा-एनडीपीएस कायद्यांतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध करून २८ ऑक्टोबरला नाशिक जिल्हा कारागृहात पाठवण्यात आले.
मुंब्रा येथील अमृतनगर परिसरात राहणाऱ्या इरफान सय्यद याच्याविरोधात ठाणे आणि गुजरातमध्ये अमली पदार्थ तस्करीचे चार गुन्हे दाखल आहेत. मेफेड्रोन (एमडी) तस्करीप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्याच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल झाले आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच जामिनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा अमली पदार्थ विक्री सुरू केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
त्याच्या वारंवारच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने पिटा-एनडीपीएस कायदा १९८८ अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलिस आयुक्तांकडे सादर केला होता. त्याला मंजुरी देत पोलिस आयुक्तांनी कायद्याच्या कलम ३ (१) नुसार एक वर्ष स्थानबद्धतेचे आदेश दिले.
इरफान याच्याविरोधात कळवा पोलिस ठाण्यात २०२६, शिळ-डायघर पोलिस ठाण्यात २०२४, मुंब्रा पोलिस ठाण्यात २०२२ आणि गुजरातमधील अहमदाबाद येथील दानिलिमडा पोलिस ठाण्यात २०२१ मध्ये अमली पदार्थ तस्करीचे गुन्हे दाखल आहेत. वारंवार गुन्ह्यांत सहभाग आढळल्याने ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलिस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.