चुकीच्या पद्धतीने मान मुरगळणे धोकादायक

चुकीच्या पद्धतीने मान मुरगळणे धोकादायक
Published on: 

चुकीच्या पद्धतीने मान मुरगळणे धोकादायक
फोर्टिसच्या डॉक्टरांचा इशारा

कल्याण, ता. ३० (वार्ताहर) : मानेचा त्रास दूर करण्यासाठी अप्रशिक्षित व्यक्तीकडून जोर लावून मान मुरगळून घेणे आरोग्यासाठी गंभीर ठरू शकते. अशा प्रकारच्या उपचारानंतर दोन तरुणांना मेंदूचा स्ट्रोक झाल्याची दुर्मिळ प्रकरणे समोर आली आहेत. मानेच्या चुकीच्या हालचालींमुळे मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांना इजा होऊन स्ट्रोकचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी अशा उपचारांपासून दूर राहून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन फोर्टिस हॉस्पिटल कल्याणच्या डॉक्टरांनी केले आहे.

पहिल्या प्रकरणात ३० वर्षीय महिलेला महिनाभरापासून मानेचा त्रास होता. त्यावर तिने एका अप्रशिक्षित व्यक्तीकडून मान मुरगळून घेतली. त्यानंतर सुमारे १२ तासांनी तिला चक्कर येणे, शरीराचा तोल जाणे, काही काळ शुद्ध हरपणे आणि चेहरा वाकडा होणे अशी लक्षणे दिसू लागली. तपासणीत मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण झाल्याचे आढळले. योग्य औषधोपचारांनंतर तिची प्रकृती सुधारली. सहा आठवड्यांत रक्तप्रवाहही पूर्ववत झाला.

दुसऱ्या प्रकरणात २७ वर्षीय तरुणाने मानेतील वेदना आणि आखडलेपणासाठी स्थानिक उपचार घेतले. त्यानंतर त्याला तीव्र चक्कर, चालताना तोल जाणे आणि हाताला मुंग्या येणे असा त्रास सुरू झाला. तपासणीत मेंदू आणि हाताला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्यांमुळे अडथळे निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले. वेळेत उपचार मिळाल्याने त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

फोर्टिस हॉस्पिटल कल्याणचे न्यूरो, स्पाइन आणि स्ट्रोक इंटरव्हेन्शन तज्ज्ञ डॉ. ऋषभ छेडा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन्ही रुग्णांवर उपचार केले. जागतिक स्ट्रोक दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा इशारा दिला. स्ट्रोकच्या उपचारात प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते. चेहरा वाकडा होणे, चक्कर येणे, हात-पाय कमजोर होणे किंवा चालताना तोल जाणे अशी लक्षणे दिसल्यास वेळ न दवडता रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. मानेचा त्रास असल्यास स्वतःहून किंवा अप्रशिक्षित व्यक्तीकडून उपचार करून घेण्याऐवजी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.