सामाईक क्षेत्रात दुष्काळग्रस्त मदत वाटपाची अडचण

सामाईक क्षेत्रात दुष्काळग्रस्त मदत वाटपाची अडचण
Published on: 

संमतीपत्राअभावी दुष्काळी मदतीचा पेच
मोखाड्यातील ७० टक्के नुकसानग्रस्त क्षेत्र सामाईक
मोखाडा, ता. १ (बातमीदार) : दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने प्रत्येकी पाच हजार रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे, मात्र सामाईक जमीन क्षेत्रातील खातेदारांची संमतीपत्रे मिळवताना प्रशासनापुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. मोखाडा तालुक्यातील सुमारे ७० टक्के नुकसानग्रस्त क्षेत्र सामाईक असल्याने मदतवाटपाची प्रक्रिया संथ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर खातेदारांनी संमतीपत्र देऊन मदतवाटपासाठी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार रोहन शिंदे यांनी केले आहे.

मोखाडा तालुक्यात खरीप हंगामाखाली १२ हजार ५०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र आहे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यातील सुमारे नऊ हजार ७०० हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाने शासनाकडे पाठवला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची मदत देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत, मात्र अनेक शेतजमिनींच्या सातबारा उताऱ्यावर एकापेक्षा अधिक खातेदारांची नावे असल्याने मदतवाटपात तांत्रिक अडथळे निर्माण झाले आहेत.

शासनाच्या नियमानुसार सामाईक क्षेत्रातील एका लाभार्थ्याला मदत देण्यासाठी इतर खातेदारांचे संमतीपत्र आवश्यक आहे. त्यामुळे संमतीपत्रे मिळाल्याशिवाय अनुदान वितरित करणे प्रशासनाला शक्य होत नाही. वनपट्टा क्षेत्रातील पात्र शेतकऱ्यांनाही या मदतीचा लाभ मिळणार आहे. दिवाळीपूर्वी मदत देण्याचे उद्दिष्ट असल्याने प्रशासनाकडून कागदपत्रांची पूर्तता आणि लाभार्थ्यांशी संपर्क साधण्याची लगबग सुरू आहे.

ॲग्रीस्टॅग आवश्यक
‘‘नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीचे पारदर्शक पद्धतीने वाटप व्हावे, यासाठी सामाईक जमीन क्षेत्रातील इतर खातेदारांनी संमतीपत्र द्यावे. तसेच शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅग ओळखपत्र काढून घ्यावे. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत जनजागृती केल्यास मदतवाटप लवकर पूर्ण होण्यास मदत होईल,’’ असे तहसीलदार रोहन शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.