

विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान
कोचाळेत वनराई बंधाऱ्याची उभारणी
मोखाडा, ता. १ (बातमीदार) : पावसाने ओढ दिल्याने जलस्रोत आटू लागले असून, आगामी काळात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पशुपक्ष्यांची तहान भागवण्यासाठी ग्रामपंचायत कारेगाव-कोचाळे, ग्रामस्थ आणि जिल्हा परिषद शाळा, कोचाळे येथील विद्यार्थ्यांनी एकत्र येत जलसंधारणाचा स्तुत्य उपक्रम राबवला. सर्वांनी श्रमदानातून कोचाळे गावालगतच्या ओढ्यावर वनराई बंधारा उभारला.
या उपक्रमात शाळेतील ५० विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सकाळी ओढ्यावर जमलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी वनराई बंधाऱ्याचे महत्त्व आणि बांधकामाची पद्धत समजावून सांगितली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ग्रामस्थ आणि पालकांच्या मदतीने दगड, माती तसेच वाळू भरलेल्या पोत्यांचा वापर करून बंधारा बांधला. या बंधाऱ्यामुळे ओढ्यातील पाणी अडवून साठवता येणार असून, त्याचा उपयोग परिसरातील पशुपक्ष्यांना होणार आहे.
पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष कृतीतून पाण्याचे महत्त्व, श्रमाचे मोल आणि निसर्गसंवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, हा उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. बंधाऱ्यात साठणारे पाणी पुढील दोन ते तीन महिने टिकण्याची अपेक्षा असून, त्यामुळे पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या जनावरांना आणि पक्ष्यांना मोठा आधार मिळणार आहे.
या वेळी ग्रामपंचायत उपसरपंच मिलिंद बदादे, माजी सरपंच हनुमंत फसाळे, शाळेचे मुख्याध्यापक दिनकर फसाळे, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सामूहिक श्रमदानातून जलसंधारणाची छोटी कृतीही मोठा बदल घडवू शकते, हे कोचाळे ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.