

उल्हासनगर, ता. १ (वार्ताहर) : इंग्रजी शिक्षणासाठी खासगी शाळांचे महागडे शुल्क परवडत नसलेल्या गोरगरीब कुटुंबांतील मुलांसाठी उल्हासनगर महापालिकेने आशेचा नवा किरण निर्माण केला आहे. महापालिका शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाला मंजुरी मिळाली आहे. आठवी ते दहावीच्या शिक्षणाचाही मार्ग मोकळा झाल्याने विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी भरारी मिळणार आहे.
उल्हासनगर शहरातील झोपडपट्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी उल्हासनगर महापालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महापौर अश्विनी निकम आणि शिवसेना नगरसेवक दुर्गा राय यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे महापालिका शाळांमध्ये पहिली ते चौथीपर्यंत इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्यास मंजुरी मिळाल्याची माहिती शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. राय यांनी २२ एप्रिलला महासभेत इंग्रजी माध्यमासह माध्यमिक शिक्षण सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला होता. प्रस्ताव सर्वानुमते मंजूर झाल्यानंतर महापौर निकम यांनी शिक्षणमंत्री दादाजी भुसे आणि शिक्षण संचालक ए. गोसावी यांची भेट घेऊन मंजुरीसाठी पाठपुरावा केला.
पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या सात शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन आहे. यासाठी शाळा क्रमांक ८, ११, १३, १४, २२, २४ आणि २७ यांचा विचार करण्यात येत आहे. तसेच सातवीपर्यंत मर्यादित असलेल्या महापालिका शाळांमध्ये आठवीचे वर्ग सुरू करून टप्प्याटप्प्याने दहावीपर्यंत शिक्षणाचा विस्तार करण्याचे नियोजन आहे. यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना खासगी शाळांच्या तोडीचे शिक्षण मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे, मात्र पात्र शिक्षकांची नियुक्ती आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचे आव्हान प्रशासनासमोर राहणार आहे.