

कालवा रस्त्याला नागरिकांचा विरोध
नैसर्गिक अधिवासाच्या रक्षणासाठी नागरिकांचा पवित्रा; पर्यायी कामांना प्राधान्य देण्याची मागणी
माणगाव, ता. १ (वार्ताहर) : वाकडाई नगर ते उतेखोल गाव पुलापर्यंत कालव्याला समांतर प्रस्तावित डांबरी रस्त्याला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या रस्त्यामुळे शहरातील महत्त्वाच्या हिरव्या पट्ट्याचे आणि जैवविविधतेचे नुकसान होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. अस्तित्वातील रस्त्यांची दुरवस्था असताना नवीन रस्त्यावर सार्वजनिक निधी खर्च करण्याऐवजी मूलभूत सुविधांची कामे करावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.
प्रस्तावित रस्त्याच्या मार्गावर उंबर, औदुंबर, पिंपळ, नीव, बांबू, काटेसावर आणि साग यांसारखे स्थानिक वृक्ष आहेत. या परिसरात विविध पक्षी, फुलपाखरे, कीटक आणि लहान वन्यजीवांचा अधिवास आहे. त्यामुळे वृक्षतोड झाल्यास पर्यावरणाचे नुकसान होईल, अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर यांनीही या प्रस्तावाला विरोध केला आहे. स्थानिकांची मागणी नसताना नैसर्गिक अधिवास नष्ट करून रस्ता उभारण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शहरातील कचेरी रोड, विद्यमान कालवा रस्ता आणि अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य द्यावे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, कालव्याचा बंधारा यापूर्वी दोन वेळा फुटल्याने प्रस्तावित रस्त्याच्या तांत्रिक सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या परिसरातून शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या तीन मोऱ्या, माणगावची मुख्य जलवाहिनी आणि महावितरणची उच्चदाब विद्युतवाहिनी जात असल्याने रस्त्याची व्यवहार्यता तपासणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिक रहिवासी प्रसाद आमरे यांनी प्रस्तावित रस्त्यामुळे परिसरातील सहा कुटुंबांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली. सरकारी वकील योगेश तेंडुलकर यांनीही सार्वजनिक निधीचा वापर आणि नैसर्गिक परिसराच्या नुकसानीबाबत आक्षेप घेतला आहे.
नकाशा, अंदाजपत्रक जाहीर करा
नगर पंचायतीने स्थानिकांची बैठक घेऊन रस्त्याचा नकाशा, अंदाजपत्रक आणि पर्यावरणीय परिणामांची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत लेखी हरकती नोंदवून कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. रस्त्याऐवजी पाणीपुरवठा, स्वच्छता, पथदिवे आणि जुन्या रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य द्यावे, अशी नागरिकांची भूमिका आहे.
फोटो ओळ : वाकडाई नगर ते उतेखोल गाव पुलापर्यंत प्रस्तावित रस्त्याला स्थानिक रहिवाशांनी विरोध दर्शविला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.