

प्रभाग समित्यांकडे संघटनांची पाठ
प्रतिनिधित्वाला प्रतिसाद नाही
वाशी, घणसोली, दिघ्यात अर्ज शून्य; नामनिर्देशनासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत संधी
वाशी, ता. १ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग समित्यांमध्ये बिनसरकारी आणि समाजलक्षी संघटनांच्या प्रतिनिधींना स्थान देण्याच्या प्रक्रियेला अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. प्रशासनाने वारंवार मुदतवाढ देऊनही वाशी, घणसोली आणि दिघा या तीन प्रभाग समित्यांसाठी एकही नामनिर्देशन अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे स्थानिक सामाजिक संघटनांचा सहभाग कमी आहे की, या प्रतिनिधित्वाबाबत पुरेशी जागरूकता निर्माण झालेली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता प्रशासनाने अर्ज स्वीकारण्याची मुदत ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढवली आहे.
महापालिकेच्या प्रभाग समित्यांमध्ये स्थानिक सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि समाजहितासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना प्रतिनिधित्व देण्याची तरतूद आहे. नागरी सुविधा, विकासकामे तसेच नागरिकांच्या स्थानिक समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी या प्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची मानली जाते, मात्र या प्रक्रियेत संघटनांकडूनच प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.
महापालिकेने सुरुवातीला २१ सप्टेंबर ते २१ ऑक्टोबर या कालावधीत नामनिर्देशन अर्ज मागविले होते. त्यानंतर अर्ज सादर करण्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अधिक वेळ मिळावा, अशी मागणी काही स्थानिक नागरिक आणि संघटनांकडून करण्यात आली होती. त्यानुसार प्रशासनाने अर्ज स्वीकारण्याची मुदत पुन्हा वाढवून ३० नोव्हेंबरपर्यंत केली आहे. तीन वेळा मुदतवाढ देऊनही वाशी, घणसोली आणि दिघा येथे अर्ज न आल्याने या प्रक्रियेतील उदासीनतेची कारणे शोधण्याची गरज निर्माण झाली आहे.
या नियुक्त्यांमध्ये स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांची भूमिका काय राहणार, याबाबतही उत्सुकता आहे. सामाजिक संघटनांना संधी उपलब्ध करून देण्यात आली असली, तरी प्रत्यक्ष सहभागासाठी त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचली आहे का, याची तपासणी आवश्यक ठरणार आहे. चौथ्यांदा मुदतवाढ देण्याची वेळ प्रशासनावर आल्याने प्रक्रियेच्या अंमलबजावणीबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
छाननीचे वेळापत्रक निश्चित
सुधारित कार्यक्रमानुसार २१ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत सार्वजनिक आणि साप्ताहिक सुट्ट्या वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. प्राप्त अर्जांची छाननी १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून होईल. त्याच दिवशी वैध अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर नियुक्ती प्रक्रियेतील पुढील टप्प्यांकडे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.