प्रभादेवीत ५ नाेव्हेंबरला रंगणार ‘पु. लं.’च्या कलाविश्वाचा उत्सव

प्रभादेवीत ५ नाेव्हेंबरला रंगणार 
‘पु. लं.’च्या कलाविश्वाचा उत्सव
Published on: 

मुंबई, ता. १ : आपल्या विनोदी लेखनातून, अविस्मरणीय व्यक्तिरेखांतून आणि नाटक-संगीतातील योगदानातून पु. ल. देशपांडे यांनी मराठी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. त्यांच्या कलाकृती आजही रसिकांच्या स्मरणात असून, त्यातील विनोद आणि माणसांचे स्वभावविशेष आजही तितकेच भावतात. अशातच आता पु. ल. यांच्या कलाकृतींसह विविध कलाप्रकारांचा आस्वाद घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने ५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान प्रभादेवी येथे ‘पु. ल. कला महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवाचे उद्घा‌टन ५ नोव्हेंबरला सायंकाळी रवींद्र नाट्यमंदिर येथे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांच्या हस्ते होणार आहे. विशेष म्हणजे, महोत्सवातील सर्व कार्यक्रम विनामूल्य असणार आहेत. महोत्सवात पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाई यांच्या जीवनावर आधारित ‘ती दोघं’, तसेच त्यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकावर आधारित ‘पुलंची पिल्ले’ हे नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. याशिवाय पु. ल. लिखित आणि संगीतबद्ध ‘या इथे चाळ बटाट्याची’ या विनोदी संगीत नाटकाचाही विशेष प्रयोग होईल. वैभव मांगले, भार्गवी चिरमुले आणि श्रीरंग भावे यांसारखे कलाकार सहभागी असलेली ‘हसता-हसवता’ ही काव्य, शब्द आणि नाट्याची मैफलही महोत्सवाचे आकर्षण असेल.

मराठी लावणीच्या क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत मधू कांबीकर आणि शकुंतला नगरकर यांच्या स्मृतींना समर्पित विशेष लावणी कार्यक्रमही यानिमित्ताने सादर केला जाणार आहे. याशिवाय पहाटेच्या रागांवर आधारित संगीत मैफल, वाद्यसंगीत, दिव्यांग कलाकारांचा नाट्यप्रयोग आणि चित्रकला व शिल्पकलेशी संबंधित उपक्रमांचाही महोत्सवात समावेश आहे. चित्रकार एम. आर. पिंपरे यांच्या चित्रांचे प्रदर्शन २ ते ९ नोव्हेंबरदरम्यान भरवण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.